पुणे

अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे

पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे

पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

पुणे:– बारामती वार्तापत्र रिपोर्ट

बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान केरळ व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत. परंतू अंडी व कुक्कूट मांस 70 अंश सेंटीग्रेड तापमानावर 30 मिनीटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.

YouTube player

 

येथील पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयात बर्ड फ्लू बाबत पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.धनंजय परकाळे, सहआयुक्त डॉ.विनायक लिमये, डॉ.राऊतमारे, जिल्हा माहिती अधिकारी तथा उपसंचालक राजेंद्र सरग उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंत कुक्कुट पक्षांमध्ये यवतमाळ जिल्हयात 200,अमरावती जिल्हयात 11 व अकोला जिल्हयात 3 अशी 214 मरतुक झालेली आहे. तर अकोला जिल्हयात 4 कावळयांमध्ये मरतुक आढळून आली आहे. महाराष्ट्र राज्यातील 12 जानेवारी 2021 पर्यंत एकूण 218 पक्षांमध्ये मरतुक झाली आहेत. हे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. तपासणीचे निष्कर्ष हाती येण्यास 48 ते 72 तास लागू शकतात. दिनांक 8 जानेवारी 2021 पासून आजतागायत एकूण 1 हजार 839 विविध पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पूर्वी पाठवलेल्या नमुन्यांचे तपासणीचे निष्कर्ष राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था भोपाळ येथून नुकतेच प्राप्त झाले असून, त्यानुसार मुंबई, ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर व दापोली या ठिकाणांचे कावळे आणि बगळे तसेच परभणी जिल्हयातील मुरुंबा या ठिकाणचे पोल्ट्री फार्म मधील नमुने हायली पॅथोजेनिक एव्हीयन एन्फ्ल्यूएन्झा (एच 5एन 1 या स्ट्रेन) करीता आणि बीड येथील नमूने (एच 5एन 8 या स्ट्रेन) करीता पॉझीटीव्ह आलेले आहेत.
लातूर येथील नमुनेही सकारात्मक आल्यानुसार, या क्षेत्रास “संसर्गग्रस्त क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात येत असून, तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या निर्बंधानुसार परभणी जिल्हयातील मुरुंबा येथील सुमारे 5 हजार 500 व केंद्रेवादी, लातूर जिल्हयातील अहमदपूर तालुक्यातील सुमारे 10 हजार कुक्कुट पक्षी, या ठिकाणच्या ज्या पोल्ट्री फार्म मध्ये बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्या पोल्ट्री फार्मपासून 1 किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात येतील. तथापि, मुंबई, ठाणे जिल्हयातील घोडबंदर, दापोली व बीड येथे केवळ सर्वेक्षण सुरु ठेवण्यात येईल.

राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणा-या पक्षांमध्ये मर्तूक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मर्तूक झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये याची माहिती द्यावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दुरध्वनी क्रमांक 18002330418 वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती द्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. मृत पक्षांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 च्या कलम 4 (1) अन्वये राज्यातील प्रत्येक पशूपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती, शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत, पशुपालक ज्यांना नमूद कायद्याशी संलग्न असणा-या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थितीची माहिती नजिकच्या ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व त्यांनी ही माहिती नजिकच्या उपलब्ध पशुवैद्यकाला लेखी स्वरुपात काळविणे बंधनकारक असल्याची नोंद घ्यावी. बर्ड फ्लू चा झालेला उद्रेक आहे त्याच ठिकाणी नियंत्रित करण्याकरीता राज्यातील प्रत्येकाने याप्रमाणे दक्षता घेणे आवश्यक असून राज्यातील बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यांत येऊ नयेत, असेही पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले आहे.
०००००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!