…अखेर त्या महिला सावकारावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उपोषणाच्या पाचव्या दिवशी पोलिसांनी घेतली दखल

…अखेर त्या महिला सावकारावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उपोषणाच्या पाचव्या दिवशी पोलिसांनी घेतली दखल
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द गावचे दाम्पत्य नीता संतोष शिंदे व संतोष शिंदे (रा. वरकुटे खुर्द, हराळी शेत,ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी सावकार छबाबाई श्रीरंग कांबळे (रा. वरकुटे खुर्द, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्या त्रासाला कंटाळून त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी इंदापूर पोलिस ठाण्यासमोर दि. १५ मार्च पासून उपोषण धरले असता उपोषणाच्या पाचव्या दिवशी इंदापूर पोलिसांनी दखल घेतली असून सदरील महिला सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदापूर तालुक्यातील मौजे वरकुटे खुर्द ( हराळीचे शेत ) येथील संतोष मारुती शिंदे ( वय ३९ ) यांनी येथील महिला सावकार छबाबाई कांबळे यांच्या कडून २०१८ मध्ये १० टक्के व्याजदराने पैसे घेतले होते.परंतु ८४ हजार रुपये मुद्दलाचे २ लाख ५२ हजार रुपये रक्कम देऊन देखील पैशाची मागणी होत होती. लॉकडाउन काळात फिर्यादी शिंदे यांच्या गाडीला काम नसल्याने ते घरीच होते.त्यावेळी महिला सावकार छबाबाई यांनी शिंदे यांच्या घरी जाऊन दमदाटी शिवीगाळ करून त्यांच्या सोबत असलेल्या अनोळखी इसमाने फिर्यादीच्या मालकीचा महिंद्रा कंपनीच्या पिकअप गाडी एमएच ४२ जीटी ९२७४ राहत्या घरासमोरुन जबरदस्तीने ओढुन नेहल्यामुळे पीडित शिंदे दाम्पत्यांनी संबंधित सावकारावर कारवाई करावी करून न्याय मिळवण्यासाठी इंदापूर पोलिसांकडे तक्रारी अर्ज दाखल केला असता पोलिसांनी दखल न घेतल्याने पोलिस ठाण्यासमोर उपोषण धरले होते. या उपोषणाच्या पाचव्या दिवशी पोलिसांनी दखल घेत अवैधरित्या सावकारी करणाऱ्या महिलेवर सावकारी कायदा २०१४ कलम ३९ , ४१ व ३७९ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास इंदापूर पोलिस करत आहेत.