अजितदादांची मोदी सरकारकडे पुण्यात 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लसीकरणाची मागणी
पुण्यातील खासदारांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव सादर करावा, अशी विनंती अजित पवारांनी केली आहे.

अजितदादांची मोदी सरकारकडे पुण्यात 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लसीकरणाची मागणी
पुण्यातील खासदारांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव सादर करावा, अशी विनंती अजित पवारांनी केली आहे.
पुणे : बारामती वार्तापत्र रिपोर्ट
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुण्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लसीकरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता अजितदादा केंद्र सरकारकडे मागणी करणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील भाजप खासदार गिरीश बापट, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव सादर करावा, अशी विनंती अजित पवारांनी केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनीच ही शिफारस केल्याचा दावा अजितदादांनी केला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
निती आयोगाच्या सदस्यांच्या सूचनेकडेही लक्ष
“महाराष्ट्रातील पुण्यासह वेगवेगळ्या राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या अधिक आहे, तिथे धोरणात्मक बदल आवश्यक आहे. 18 वर्ष वयोगटावरील नागरिकांसाठी तात्काळ लसीकरण उपक्रम सुरु करण्यात यावा. त्यासाठी संबंधित राज्यांना अधिकाधिक लसी उपलब्ध करुन द्याव्यात” असं अजित पवार म्हणाले. अशा जिल्ह्यांमध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज निती आयोगाच्या (आरोग्य) सदस्यांनी केल्याकडेही अजित पवारांनी लक्ष वेधले.
सध्या कोणाकोणाला लसीकरण?
कोव्हिड योद्ध्यांनंतर आता सर्वसामान्य जनतेला कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. एक मार्चपासून 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली. 45 वर्षांवरील सहव्याधी (कोमॉर्बिडीटीज) असलेल्या नागरिकांनाही लस दिली जात आहे. 10 हजार सरकारी, तर 20 हजार खासगी केंद्रांवर कोरोना लस उपलब्ध आहे. खासगी केंद्रांवर कोरोना लस घेण्यासाठी अडीचशे रुपये शुल्क मोजावे लागते, तर सरकारी केंद्रांवर मोफत लसीकरण केले जाते.
पुण्यात कडक निर्बंध
पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहे. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. येत्या 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उद्यान एकवेळ बंद राहणार आहेत. हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत. तसेच लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली जाणार नाही.