अजित पवारांच्या बारामतीतील घराममोर घुमला ढोल
मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील घरासमोर 'ढोल बजाव' आंदोलन केले.
अजित पवारांच्या बारामतीतील घराममोर घुमला ढोल
बारामती वार्तापत्र
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या स्थगितीनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारनं न्यायालयात जोर लावावा यासह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या घरासमोर ‘ढोल बजाव’ आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. सकल मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील घरासमोर ढोल वाजवून आंदोलन केलं.
बारामतीतील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानासमोर हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे घरी उपस्थित नव्हते. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाचं प्रकरण मोठ्या खंडपीठाकडं सोपवताना सध्याच्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे.
त्यामुळं मराठा समाजाचे विद्यार्थी व बेरोजगार तरुणांपुढे पेच उभा राहिला आहे. राज्य सरकारनं यातून मार्ग काढावा. आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत मराठा समाजाला विविध प्रकारचे लाभ दिले जावेत. तसंच, आरक्षणाची आधीच सुरू झालेली प्रक्रिया बंद करू नये. त्यासाठी अध्यादेश काढावा. राज्यात कुठलीही नवी नोकरभरती केली जाऊ नये, अशा मराठा संघटनांच्या मागण्या आहेत. या मागण्यांवर सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा, अशी मराठा संघटनांची अपेक्षा आहे. त्यासाठी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, अण्णासाहेब घोलप यांच्यासह मोठा फौजफाटा उपस्थित होता. ढोल बजाव आंदोलनानंतर मिलिंद मोहिते यांना निवेदन देण्यात आले. मागण्यांबाबत विचार न झाल्यास कोरोनाचा विचार न करता यापुढे मोठे आंदोलन मराठा समाजाच्या वतीने उभे केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.