
अनुराधा पाटील यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
68 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन
इंदापूर : प्रतिनिधी
बावडा येथील श्रीमती अनुराधा अरुणराव पाटील (वय- 68 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी (दि.18) मध्यरात्री 12.30 वा. निधन झाले. त्यांचे पार्थिवावर शुक्रवारी (दि. 19) दुपारी 1 वा.बावडा येथे इंदापूर-अकलूज रस्त्यावरील अनुराधा निवासस्थाना शेजारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील यांच्या त्या मातोश्री तर राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या चुलती होत. अनुराधा पाटील यांची बावडा भागात माई या नावाने ओळख होती.त्या धार्मिक वृत्तीच्या असल्याने त्यांचा बावडा परिसरातील सांप्रदायिक क्षेत्राला मोठा आधार होता. त्यांचे पाठीमागे एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
बावडा ग्रामस्थांकडून गाव बंद ठेवून अनुराधा पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अंत्यसंस्कार प्रसंगी देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थान माजी अध्यक्ष ह. भ. प. बापूसाहेब महाराज मोरे, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, ह.भ.प. लक्ष्मण महाराज आसबे यांनी मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. अंत्यसंस्कारास इंदापूर तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे विविध नेते,विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.