अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून

कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा बनाव केला. परंतु पोलिसांना याची कुणकुण लागली आणि त्यांनी तपास केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून

कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा बनाव केला. परंतु पोलिसांना याची कुणकुण लागली आणि त्यांनी तपास केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

क्राईम ; बारामती वार्तापत्र

पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्यानंतर त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा बनाव केला. परंतु पोलिसांना याची कुणकुण लागली आणि त्यांनी तपास केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत या दोघांनाही अटक केली.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मनोहर हांडे (वय 22) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी अश्विनी मनोहर हांडे (वय 19, रा. उरुळी कांचन) व प्रियकर गौरव सुतार चव्हाण (वय 19, फुरसुंगी) या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाआधी अश्विनी आणि गौरव यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मनोहर आणि अश्विनी यांचे सहा महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. लग्नाआधी अश्विनी आणि गौरव यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम. दोघांनाही विवाह करायचा होता. परंतु घरच्यांची परवानगी नसल्यामुळे त्यांना विवाह करता आला नाही. अशातच अश्विनीच्या कुटुंबीयांनी जानेवारीमध्ये तिचा विवाह मनोहर यांच्याशी लावून दिला. दरम्यान गौरव आणि अश्विनी यांना एकमेकांपासून करमत नव्हते. त्यामुळे त्यांनी एके दिवशी हा भयानक कट रचला.

कोरोनाचा फायदा उचलण्याचे ठरवले
त्यांनी कोरोनाचा फायदा उचलण्याचे ठरवले. एके दिवशी आरोपी गौरव यांनी अश्विनी हिच्याकडे झोपीच्या गोळ्या आणून दिल्या. अश्विनीने झोपण्यापूर्वी दुधात या गोळ्या टाकून हे दूध मनोहरला पिण्यासाठी दिले. त्यानंतर तो गाढ झोपेत असताना गळा आवळून त्याचा खून केला. दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी मनोहर उठत नसल्याचा कांगावा करत त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी उपचारानंतर त्याला मृत घोषित केले.

मनोहरचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला अन्…

दरम्यान दोघाही आरोपींना कोरोनामुळे शवविच्छेदन होणार नाही, असे वाटले. मात्र मनोहरचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि शवविच्छेदन झाले. परंतु त्यातूनही मृत्यूचे ठोस कारण समोर आले नाही. मात्र ससून रुग्णालयाने याची माहिती लोणी काळभोर पोलीस दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात दाखल केली होती.

गौरव याला ताब्यात घेऊन विचारपूस केली
लोणी काळभोर पोलीस या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेऊन होते. काही दिवसांनी त्यांना याप्रकरणी गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी गौरव याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक काळे, उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर व त्यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!