ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर भिगवण परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट
चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.

ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर भिगवण परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट
चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
भिगवण परिसरामध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दोन दिवसांमध्ये झालेल्या दोन चोरीच्या घटनांमध्ये ७ लाख ३ हजारांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले आहेत. विशेष म्हणजे यातील एक घटना दिवसा ढवळ्या घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत नव्यानेच पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे ताब्यात घेतलेले डॉ. अभिनव देशमुख यांनी विशेष मोहीम राबवून या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
याबाबत भिगवण पोलिस स्टेशनला सदर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी भिगवण येथे (दि.०४) रोजी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत सकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास न्यु सुदर्शन ट्रेडर्स या गोळ्या बिस्कीटाचे होलसेल दुकानामधील काऊंटर वरुन एका कापडी पिशवीत ठेवलेली ७ लाख रुपयांची रोकड घेऊन चोर फरार झाला आहे. या बाबत उत्तम विष्णु पन्हाळकर (वय. ४०, रा. भिगवण, ता. इंदापुर,जि . पुणे) यांनी फिर्याद दिली असून, अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच, (दि.०३) रोजी सायंकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर, डाळज नं.३ येथे ट्रॅक्टरला डिझेल घेऊन काळेवाडीकडे जात असलेल्या मोटार सायकल चालकास, पांढऱ्या रंगाच्या बोलेरो जीपमधून आलेल्या एका अज्ञात इसमाने मोटरसायकल अडवून, जीवे मारण्याची धमकी देऊन, त्याच्या खिशातील असलेली ३ हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून घेऊन गेला आहे. याबाबत, मंगेश बाळासाहेब नायकवाडी (वय. ३०, व्यवसाय. शेती, रा.श्रीराम मंदिराजवळ , पळसदेव, ता. इंदापूर, जि. पुणे)
यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनुक्रमे सहाय्यक फौजदार काळे व पोलिस उपनिरीक्षक रियाज शेख हे करीत आहेत.