कोरोंना विशेष

अहमदनगर जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल पंप खाजगी वाहनांसाठी बंद जिल्हाधिकारी

अहमदनगर, दि.14- कोरोना विषाणू (कोव्‍हीड 19) चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्ह्यातील अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत, अहमदनगर छावणी परिषद तसेच जिल्‍हा महसूल स्‍थळ सीमेच्‍या हद्दीमध्ये कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर, गल्लोगल्ली याठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे असे कृत्य करण्यास दि.15 एप्रिल 2020 ते दि.30 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई करण्यात आली आहे. जिल्हादंड़ाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहे.

त्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव, उरुस, जत्रा मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रिडा व इतर सर्व स्पर्धा इत्यादींना मनाई राहील. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारचे कृत्य जसे कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणुक, मेळावे, सभा, आंदोलने, देशांतर्गत व विदेशी सहली इत्यादींचे आयोजन करण्यास मनाई राहील. कार्यक्षेत्रात असणारी दुकाने, सेवा आस्थापना, उपहारगृह, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपरमार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब पब, क्रिडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे,नाटयगृहे,शाळा, महाविद्यालय, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायाम शाळा, संग्रहालय बंद राहतील. मंदीर, मस्जिद, गुरुद्वार, चर्च व इतर धार्मिक स्‍थळे नागरिकांचे प्रवेशासाठी बंद राहतील व सर्व नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणाशिवाय येण्यास मनाई राहील.

हा आदेश खालील बाबतीत लागु होणार नाही- यांत १.शासकिय, निमशासकीय कार्यालय, सरकारी महामंडळाचे उपक्रम/ आस्थापना. बँक, एटीएम, विमा सेवा, २.अत्यावश्यक सेवा मधील व्यक्ती, रुग्णालय,पॅथॉलॉजी, लॅबोरेटरी, दवाखाने, अॅम्‍बुलन्‍स, ३.अंत्यविधी (गर्दी टाळून), ४.अत्‍यावश्‍यक किराणा सामान ( सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यत), ५. दूध विक्री ( सकाळी 5 ते 8 वा. व सायं. 5 ते रात्री 7 वाजेपर्यत), ६. फळे व भाजी-पाला, औषधालय, एलपीजी गॅस वितरण सेवा,

७.पेट्रोल पंप- सर्व खाजगी दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांसाठी पेट्रोल विक्री पूर्णतः बंद करण्‍यात येत आहे. (शासकीय वाहने, अॅम्‍बुलन्‍स व वैद्यकीय सेवा देणारे डॉक्‍टर्स व परिचारीका व वैद्यकीय सेवेशी निगडीत कर्मचारी यांना ओळखपत्र तपासून सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यत पेट्रोल विक्री करण्‍यात येईल) व डिझेल विक्री – दररोज सकाळी 5 ते दुपारी 12 वाजेपर्यत राहील.

८. प्रसारमाध्यमांचे (सर्व प्रकारचे देनिक) नियतकालिके, टि.व्ही. न्युज चेंनेल इत्यादींचे कार्यालय,

९. दूरसंचार पोस्‍ट व इंटरनेट सेवा पुरविणा-या आस्‍थापना, १०.चिक्‍स, चिकन व अंडी दुकाने व वाहतूक सेवा, ११.जनावरांचे खाद्य, खुराक, पेंड विक्री दुकाने व वाहतुक सेवा, १२.पशुवैद्यकीय दवाखाने, पशु औषधालय दुकाने व वाहतुक सेवा, १३. शेतमाल वाहतुक व विक्री, बियाणे, खते व किटक नाशके यांचे उत्‍पादन, साठवणूक, वाहतूक व विक्री.

कोणतीही व्‍यक्‍ती संस्‍था, संघटना यांनी या आदेशाचे उल्‍लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कमल 188 नुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे जिल्‍हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!