अहमदनगर हॉटस्पॉट केंद्र जाहीर
*सर्वांनी सुरक्षित राहावे हाच हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्याचा उद्देश*
*कोणत्याही नागरिकांची गैरसोय होणार नाही*
*पुरेशा प्रमाणात जीवनावश्यक वस्तु पुरविण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश: पालकमंत्री हसन मुश्रीफ*
अहमदनगर – जिल्ह्याच्या काही भागात हॉटस्पॉट केंद्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जाहीर केले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठीची ती उपाययोजना आहे. त्यामुळे या काळात जिल्हा प्रशासनाने केलेल्या सर्व प्रतिबंधात्मक उपायांना सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. हॉटस्पॉट जाहीर केलेल्या भागातील नागरिकांना सर्व जीवनावश्यक सेवा आणि वस्तूंचा पुरवठा नियमितपणे आणि वेळेत होईल, याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील मुकुंदनगर (नगर शहर), आलमगीर (ता. नगर), जामखेड, नाईकवाडपुरा ( संगमनेर), नेवासा, कोपरगाव आदी ठिकाणी कोरोना संसर्ग बाधीत व्यक्ती आढळल्याने जिल्हा प्रशासनाने या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. मात्र, यामुळे या परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याचे काहींचे म्हणणे होते. त्यावर, कोरोना विरूध्द लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. या ठिकाणच्या नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले.
यासंदर्भात, पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. त्यात ते म्हणतात, “नगर जिल्ह्यात कोरोनाबाधित काही ठिकाणे हॉटस्पॉट म्हणुन जाहीर करून सक्तीची संचारबंदी केलेली आहे. उद्देश फक्त तुम्ही सर्वांनी सुरक्षित राहावे व कोरोना व्हायरस विषाणूमुळे संक्रमित होऊ नये इतकाच आमचा प्रयत्न आहे. विशेषतः मुकुंदनगर, आलमगीर, जामखेड, संगमनेर (नाईकवाडपुरा), नेवासा, कोपरगाव या काही विभागामध्ये नागरिकांना मनाविरुद्ध राहावे लागत आहे. याची आम्हाला जाणीव आहे. महानारपालिका प्रशासन हे आपल्या गरजा पूर्ण करत नाही. जीवनावश्यक वस्तूंची कमतरता आहे अशी तक्रार नागरिक जिल्हाधिकारी, आमदार यांच्याकडे करत आहे. सदर वस्तूंची कमतरता होणार नाही याची आन्ही काळजी घेऊ. किंबहुना प्रशासनास सक्त ताकीद दिली आहे. आपल्या विभागामध्ये माझी व आपले आमदार संग्राम जगताप यांना येण्याची मनापासून इच्छा आहे. परंतु तुमच्या भविष्यासाठी व सुरक्षिततेसाठी आम्ही संयम पाळून आहोत. फक्त एक आठवडा कळ काढा. सहकार्य करा. तुमच्या पाठीशी आम्ही छातीवर दगड ठेऊन हे करत आहोत. सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे. अशी विनंती आहे.”
ही वेळ सर्वांनी सहकार्य करण्याची आहे. सहकार्य केले तर लवकर ही परिस्थिती पूर्ववत होईल, असा मला विश्वास आहे. सोशल डीस्टनसिंग पाळावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. येत्या आठवडाभरात आपण पूर्वस्थितीला येऊ. आपण निश्चितपणे या कोरोनाच्या संकटावर मात करू, असा विश्वास पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी व्यक्त केला.