आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली
कुरणेवाडी, कन्हेरीत नवीन रुग्ण.
बारामतीत काल घेण्यात आलेल्या नमुन्यापैकी आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. बारामती तालुक्यातील कुरणेवाडी येथील ५८ वर्षीय पुरुष आणि कन्हेरी येथील ४४ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
बारामतीत काल ५३ जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यामध्ये ४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. तर गुणवडी येथील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. यातील तिघांचे अहवाल प्रलंबित होते. आता हे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
नव्याने आढळलेल्या दोन रुग्णांमध्ये बारामती तालुक्यातील कुरणेवाडीतील ५८ वर्षीय पुरुष आणि कन्हेरी येथील ४४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. बारामतीत दिवसेंदिवस कोरोंनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून आता नागरिकांनी स्वत:हून दक्षता घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.