आधी चंद्रकांतदादांनी पवारांचा ‘बाप’ काढला; आता राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीनं स्थगितीनंतर लगेच फतवा काढला.
आधी चंद्रकांतदादांनी पवारांचा ‘बाप’ काढला; आता राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीनं स्थगितीनंतर लगेच फतवा काढला.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(chandrakant patil) यांनी शेलक्या भाषेत टीका केली होती. सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तसेच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीनं सेस गोळा करण्याच्या केलेल्या घोषणेनंतर चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. यांच्या बापाची पेंड आहे का?; अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी फटकारलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांनीसुद्धा चंद्रकांतदादा पाटलांवर टीकास्त्र सोडलं आहे.
चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात. सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायची आहे. महाराष्ट्रात भाजपाची आंदोलने चालू आहेत, याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे?, असा सवालच राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंनी उपस्थित केला आहे.
तत्पूर्वी चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, शेतकऱ्यांच्या फायद्याचे हे कायदे आहेत. त्यांना विरोध करणारे शेतकरीविरोधी आहेत. त्यांना शेतकरी गरीब राहावा, असं वाटतं. अद्याप महाराष्ट्रात त्या कायद्याला विरोध झालेला नाही, जरी राज्य सरकारनं स्थगिती दिलेली असली तरी ती कोर्टात जाऊन 8 ते 10 दिवसांत उठवू, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यांना अशी स्थगिती देताच येणार नाही. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीनं स्थगितीनंतर लगेच फतवा काढला. आता आम्ही बाजाराच्या बाहेर माल विकणाऱ्यांकडून सेस गोळा करणार, यांच्या काय बापाची पेंड आहे काय?, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोण तरी पत्र देते, कोण तरी स्थगिती देते, तर कोण तरी प्रसिद्धिपत्रक देते. हे शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आहेत. त्याला विरोध करणं चुकीचं असल्याचंही मतही चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं आहे.
तसेच ‘पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील, तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका. आम्ही पण तुमचे बाप आहोत,’ अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना टोला लगावला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडूनही भाजपाला जशास तसे उत्तर देण्यात आले आहे.