आबासाहेब देवकाते यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आरोपींच्या अटकेसाठी भिगवण बंद
बंद दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
आबासाहेब देवकाते यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आरोपींच्या अटकेसाठी भिगवण बंद
बंद दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
मागील सप्ताहात पुणे सोलापूर महामार्गावरील मदनवाडीत जेवण चांगले दिले नाही यामुळे बील देणार नाही म्हणून टोळक्याने दहशत माजवून हॉटेल चालकाला मारहाण करण्याचा प्रकार घडला होता.दरम्यान भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या इंदापूर बाजार समितीचे संचालक आबासाहेब देवकाते यांच्यावर देखील यावेळी जीवघेणा हल्ला करण्यात आला.या घटनेला तब्बल एक आठवडा ओलांडला मात्र यातील हल्लेखोर अद्याप मोकाट असल्याने आज भिगवण व मदनवाडी परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. पोलीस विभागाने तातडीने या प्रकरणातील हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी आबासाहेब देवकाते समर्थकांनी केली आहे.
पुणे सोलापूर महामार्गावरील मदनवाडी गावच्या हद्दीत उजनी हॉटेलवर हा प्रकार घडला होता. हॉटेल चालक संतोष हनुमंत देवकाते यांच्या तक्रारीवरुन सहाजणांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष पवार रा.दहिगाव ता.करमाळा जि. सोलापूर बाळू शेंबडे रा.शेलगाव ता करमाळा जि सोलापूर सुजित ठोंबरे ,अमर ठोंबरे , दादा होगले,विजय गुटाळ ही गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे असून यातील आरोपी अद्याप मोकाट असल्याने त्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीच्या समर्थनार्थ आज भिगवण व मदनवाडी परिसरात व्यापारी वर्गासह नागरिकांनी बंद पाळत आंदोलन छेडले.
इंदापूर तालुक्यात समाजकारण व राजकारणात आबासाहेब देवकाते यांची वेगळी ओळख असून त्यांच्या वर काही दिवसापूर्वी भ्याड हल्ला झाला आहे.या हल्ल्यातील जे हल्लेखोर आहेत त्यांची ओळख मिळाली असून देखील यातील आरोपी अद्याप अटक नाहीत.आबासाहेब देवकाते मित्र परिवाराने शांततेच्या मार्गाने बंद पाळून याबद्दलचा आपला रोश व्यक्त केला.पोलीस यंत्रणेने कोणासही पाठीशी न घालता त्वरीत अटक करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.जर यात दिरंगाई केली जात असेल तर मात्र यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा देखील आबासाहेब देवकाते मित्र परिवाराकडून देण्यात आला आहे.
पोलीस या प्रकरणाचा तपास करित असून स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीणची कार्यान्वित पथके यातील आरोपींचा शोध घेत असून लवकरात लवकर यातील आरोपींना अटक केली जाईल असे भिगवणचे सहाय्यक पोलीस निरिक्षक जीवन माने यांनी सांगितल्या नंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.