इंदापुरात पहिला कोरोना रुग्ण.
कोरोनामुक्त असलेल्या इंदापूर शहरात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण.
इंदापुरात पहिला कोरोना रुग्ण.
कोरोनामुक्त असलेल्या इंदापूर शहरात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण.
बारामती:वार्तापत्र
आतापर्यंत तालुक्यात सपाडलेले सर्व रुग्ण मुंबई, पुणे आणि सोलापूरमधून आलेले. शहरात अद्याप एकाही रुग्णाची नोंद नव्हती.
इंदापूर, दि. ६ जून : प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त असलेले इंदापूर शहर आता कोरोनाच्या छायेत आले आहे. आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी सोलापूर शहरात गेलेले गृहस्थ मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे सोलापूरमध्येच अडकले होते. इंदापूरमध्ये आल्यानंतर रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना पुण्याच्या रुबीहॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी केलेल्या चाचणीत त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
लॉकडाऊनच्या पूर्वी सोलापूमध्ये आपल्या नातेवाईकांना भेटण्यास गेलेली इंदापूर शहरातील सावतामाळीनगर भागात राहणारी व्यक्ती रविवार (३१मे) रोजी इंदापूरमध्ये राहत्या घरी परतली होती. दुसऱ्याच दिवशी सोमवार दि. ०१ जून) रोजी रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने अंदाजे ८० वर्षे वय असलेल्या या व्यक्तीला पुण्याच्या रुबीहॉल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आली. मात्र, तब्बल एका आठवड्यानंतर काल शुक्रवार (दि. ०५ जून) रोजी कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने त्यांची दुसऱ्या वेळी कोरोनाची चाचणी करण्यात आल्याने त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
वयस्कर असलेल्या या रुग्णाला पुण्यामध्ये उपाचारासाठी दाखल केल्यानंतरच कोरोनाची लागण झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १९ जणांना त्वरित आयसोलेट करण्यात आले असून त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती चंदनशिवे (वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय, इंदापूर) यांनी दिली. तर रुग्णाच्या संपर्कात अजून किती लोक आले आहेत? प्रशासन याचा शोध घेत आहे. अशी माहिती डॉ. प्रदीप ठेंगल (मुख्याधिकारी, नगरपरिषद, इंदापूर) यांनी दिली आहे.
प्रशासनाच्या अहोरात्र मेहनतीमुळे मागील अडीच महिन्यापासून कोरोनामुक्त राहिलेल्या इंदापूर शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने इंदापूर शहरातील नागरिक भलतेच घाबरले आहेत. बातमी शहरात पसरताच दोन आठवड्यांपासून कोरोना पासून भयमुक्त झालेल्या इंदापूर शहरात काही वेळेतच स्मशान शांतता पसरली. इंदापूर तालुक्यात आतापर्यंत सापडलेले सर्व रुग्ण हे आसपासच्या खेडेगावात सापडले होते, अद्याप शहरात एकाही रुग्णाची नोंद झाली नव्हती.
यावेळी दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री व विद्यमान आमदार, इंदापूर तालुका) यांनी आतापर्यंत इंदापूरकरांनी ज्या पद्धतीने नियम पाळले आहेत. त्याचे कौतुक करताना, नागरिकांना घाबरून न जाता प्रशासनाने दिलेले नियम योग्य पद्धतीने पाळण्याचे तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले. त्यासोबतच इंदापूर शहरात पुणे, मुंबई, सोलापूर तसेच, अन्य भागातून आलेल्या नागरिकांची, नातेवाईकांची माहिती प्रशासनाला कळविण्याची विनंती केली आहे.
खबरदारीचे उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील भगतसिंग चौक, सावतामाळीनगर, आंबेडकर नगर परिसर, नेहरू चौक परिसर नागरिकांसाठी प्रतिबंधित करण्यात आले असून इंदापूर शहरातील नागरिकांमध्ये अजूनही कोरोनाविषयी बरेच गैरसमज व भीती असल्याने नागरिक बाहेर गावाहून आलेल्या नातेवाईकांची आणि आपल्या परिसरात आलेल्या नागरिकांची माहिती लपवत आहेत. नागरिकांकडून आम्ही माहिती जबरदस्ती गोळा करू शकत नाही. कृपया नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे कोरोनाविषयी मागील अडीच महिन्यापासून जनजागृती करणारे, परगावाहून आलेल्यांची माहिती गोळा करणारे अशोक चिंचकर (नगरपरिषद कर्मचारी) यांनी सांगितले आहे