इंदापूर

इंदापुर तालुक्यातील २२ गावचे पाणी बारामतीकरांनी पळवले.

आता २२ गावच्या लाकडी - निंबोडीच्या  नावाखाली  उजनीच्या पाण्यावर डोळा 

इंदापुर तालुक्यातील २२ गावचे पाणी बारामतीकरांनी पळवले.

आता २२ गावच्या लाकडी – निंबोडीच्या  नावाखाली  उजनीच्या पाण्यावर डोळा

 निमगाव केतकी ,प्रतिनिधी ; बारामती वार्तापत्र

इंदापूर तालुक्यातील २२ गावांचा पाण्यासाठीचा संघर्ष हा आजचा संघर्ष नव्हे तर कै.सुर्यकांत आप्पा रणवरे यांच्या नेतृत्वाखाली सन १९७१ साली सुरु झाला आहे. त्यांच्या व समितीच्या संघर्षाची दखल घेवुन इंदापुरच्या ‘त्या’ २२ गावांसाठी नीरा डावा कालव्यातुन ४ टीएमसी व खडकवासला धरणातून ३.९ टीएमसी असे एकूण ७.९ टीएमसी पाणी सणसर कट ची स्थापना करुन त्याचे काम मार्च १९९४ ला पुर्णत्वास गेले आहे. मात्र बारामतीकरांनी इंदापूरकरांच्या ताटातील ही भाकरी ओढुन आपल्या ताटात घेतली अन् आता सोलापूरकरांची भाकरी इंदापूरकरांच्या ताटात ओढत असल्याचे सांगुन बारामतीच्या भागात नेहण्याचा डाव आहे. इंदापूरचे तरतूद केलेल्या ‘ते’ ७.९ टीएमसी पाणी गेले कुठे असा सवाल उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी केला आहे.

पुढे बोलताना खुपसे-पाटील म्हणाले की,इंदापूर तालुक्यातील शेळगाव, अथूर्णे, शिरसटवाडी, निमषाखर, निरवांगी, खोरोची, दगडवाडी, घोरपडवाडी, सराफवाडी, गोतंडी, रेडा, रेडणी, बोराटवाडी, चाकाटी,  पिटकेव्वर, निमगाव – केतकी , पिठेवाडी, लाखेवाडी, वडापूरी, काटी, भांडगाव, अवसरी  या गावांच्या संबधी हा पाण्याचा प्रश्न आहे.

या बावीस गावांना बारमाही पाणी मिळावे यासाठी एका कृती समितीच्या माध्यमातून कै. सुर्यकांत आप्पा रणवरे यांनी परिसरातील शेतकरी घेऊन तरुण वयात कृती समितीच्या माथ्यमातून १९७१ पासुन आंदोलने, रास्ता रोको, उपोषण करण्यास सुरुवात केली. सततचा संघर्ष आणी पाठपुरावा केला. अखेर शासनातर्फे सुर्यकांत रणवरे आप्पा आणी त्यांच्या शेतकऱ्यांच्या संघर्षाची दखल घेऊन २० फेब्रुवारी १९८९ रोजी इंदापूर तालुक्यातील बावीस गावांना आठमाही ऐवजी बारमाही पाणी देण्याचा निर्णय होऊन आमलबजावणी संदर्भात अध्यादेशही काढला. या कामासाठी ६४७.७९ लक्ष एवढा निधीही मंजूर करण्यात आला. व कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्याचे आदेश ही देण्यात आले.

इंदापूर तालुक्यातील बावीस गावांना बारमाही पाणी देण्याचा निर्णय झाल्यानंतर सणसर कटचे काम १९९४ ला पुर्ण झाले.  ९ ऑगष्ट १९९४ क्रांतीदिनाच्या दिवशी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत, खासदार बापूसाहेब थिटे यांच्या अध्यक्षतेखालील निमगाव केतकी येथे बारमाही पाणी वाटपाच्या निमित्ताने मोठी सभाही झाली.

या निमगाव केतकीच्या सभेत शरद पवार साहेबांनी बावीस गावातील शेतकऱ्यांना आणी सभेला संबोधताना असे म्हणाले की,  शेतकरी बांधवांनो आता तुमचे स्वप्न साकार होत आहे. तुम्हाला  बारमाही पाणी देण्याचा निर्णय झाला आहे.  सणसर कटचे काम पुर्ण झाले आहे. तरी येथून गेल्यावर आपल्या शेतातत उसाची लागवड करा. यामुळे शेतकरी आनंदला. निराडाव्या कालव्याचे चार टीएमसी आणी खडकवासल्याचे ३.९ टीएमसी असे ७.९ टीएमसी पाणी या बावीस गावांतील शेतकऱ्यांना मिळणार होते आणी बारामहिन्याच्या बारा पाण्याच्या पाळ्या मिळणार होत्या. मात्र आज ५० वर्षाच्या काळानंतर हे सगळं मृगजळच राहीले.

आणि इंदापूरला मिळालेले ते पाणी बारामतीकरांनी पळविले असुन आता आमच्या उजनी जलाशयावर डोळा ठेवुन आहेत. त्यासाठी सांडपाणी शब्द वापरुन दिशाभूल काय करतात…? तुमचा पाळीव तत्कालीन अधिकारी सुर्वे याला समितीचा अध्यक्ष करुन पाणी नियोजन करायला काय सांगतात..? हा सगळा सोलापूरकरांचा संसार उध्वस्त करण्याचा डाव असुन तो आम्ही यशस्वी होवु देणार नसल्याचे सांगुन इंदापूरच्या शेतकऱ्यांना उजनीच्या पाण्यासाठी कधीच संघर्ष केला नाही अथवा त्यांना गरज देखील नाही. इंदापूरकरांचा खरा शत्रू बारामतीवाले असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.

चौकट
२००९ ला बारामती सोडण्याचे हेच कारण होते
– इंदापूरला पाणी देतो म्हणून तेथील शेतकऱ्यांना गंडविले. मात्र त्यांच्या हक्काचे आणि शासकीय अध्यादेश निघालेले ७.९ टीएमसी पाणी बारामतीकरांनी पळविले. त्यामुळे ‘त्या’ २२ गावांनी रास्ता रोको, उपोषण करुन लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशाचे नेते शरद पवारांनी तेथून पळ काढुन माढा लोकसभा लढवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!