इंदापूरचा सुपुत्र एसपी निंबाळकर आसाम मिझोरामच्या सीमेवरील झालेल्या हिंसाचारात जखमी
एसपी निंबाळकर लवकरात लवकर बरे व्हावेत सुप्रिया ताई सुळे कडून सदिच्छा व्यक्त

इंदापूरचा सुपुत्र एसपी निंबाळकर आसाम मिझोरामच्या सीमेवरील झालेल्या हिंसाचारात जखमी
एसपी निंबाळकर लवकरात लवकर बरे व्हावेत सुप्रिया ताई सुळे कडून सदिच्छा व्यक्त
बारामती वार्तापत्र
आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांतील नागरिकांमध्ये राज्यांच्या सीमांवरून जोरदार हिंसाचार उफाळला आहे. सोमवारी झालेल्या हिंसाचाराला आवर घालण्याचं कर्तव्य बजावताना आसाम पोलिसांचे 6 जवान धारातिर्थी पडले. तर अन्य 50 पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर सिलचरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
या जखमी झालेल्या पोलिसांमध्ये इंदापूरच्या एका सुपूत्राचा देखील समावेश आहे. वैभव चंद्रकांत निंबाळकर असं त्याचं नाव असून ते इंदापूर तालुक्यातील सणसर येथील रहिवासी आहेत. पण सध्या ते आसाम राज्यातील कछार जिल्ह्याचे एसपी म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान सोमवारी जमावानं केलेल्या हल्ल्यात एसपी वैभव निंबाळकर देखील गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. तसेच एसपी निंबाळकर लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी सदिच्छा व्यक्त केली आहे. निंबाळकर यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संघर्ष कशामुळे?
आसाम आणि मिझोरामच्या नागरिकांमध्ये सीमेवरून गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ईशान्येकडील राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांची शिलॉंगमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीला दोन दिवस होण्यापूर्वीच पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला असून दोन्हीकडचे नागरिक एकमेकांना भिडले आहेत. या जमावाला आवर घालताना अनेक पोलीस जखमी होत असून त्यातील 6 जणांना आपले प्राण गमावावे लागले आहेत.
झोपड्या जाळल्यामुळे हिंसाचार
आसाम आणि मिझोरामच्या सीमाभागात राहणाऱ्या 8 शेतकऱ्यांच्या झोपड्यांना आग लागल्याच्या कारणावरून हा हिंसाचार उफाळला. अज्ञात समाजकंटकानं ही आग लावली असून त्याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. मात्र या आगीच्या कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या धुसफुशीला तात्कालिक कारण मिळालं आणि संघर्षाला तोंड फुटलं.