म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या सहा आरोपींना अटक; 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

औरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे परिसरामध्ये संशयिताना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू

म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या सहा आरोपींना अटक; 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

औरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे परिसरामध्ये संशयिताना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू

प्रतिनिधी

आरोग्य विभागाच्या परीक्षांचा गोंधळ आणि त्यानंतर पेपर फुटी पराक्रम आणि त्यानंतर पेपर फोडणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर आता पुणे सायबर पोलिसांनी आज (रविवारी) होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. त्यामुळे या आठवड्यात होणाऱ्या म्हाडाच्या सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

आरोपींकडून अशी करण्यात आली होती तयारी

आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गाच्या पदाच्या परीक्षांच्या पेपर फुटीच्या तपासासाठी सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये असताना आज होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षेचे पेपर फोडण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यामध्ये गुंतलेल्या संशयीतांबाबत पुणे शहर पोलीसांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती.

त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे सायबर क्राइम विभागाकडील पथके तयार करून त्यांना औरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे परिसरामध्ये संशयिताना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.

त्यांनतर औरंगाबाद परिसरातील संपर्क साधून त्यांच्याकडून आर्थिक फायदा मिळवून त्यांना परीक्षेच्या पूर्वी पेपर फोडून त्यांना देण्याची योजना टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडेमीचे संचालक कृष्णा जाधव आणि इतर यांनी आखल्याची माहिती प्राप्त झाली होती. तसेच सध्या पुण्यामध्ये राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांनी म्हाडाच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या परीक्षार्थीना पेपर देण्याची तयारी दर्शवली होती.

जी ए सॉफ्टवेअरचे प्रितेश देशमुख यांना अटक

पोलीस पथकाने टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडेमीचे संचालक कृष्णा जाधव आणि त्यांचे सहकारी अंकित चनखोरे यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे म्हाडाच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या ३ परीक्षार्थी यांची प्रवेशपत्रे त्यांची मूळ शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे कोरे धनादेश आरोग्य विभागाच्या क वर्गासाठी बसलेल्या १६ आणि ड वर्गासाठी बसलेल्या ३५ परीक्षार्थी यांच्या नावाच्या याद्या प्रवेश पत्रांच्या प्रती मिळून आले.

आरोपी हे आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपर फुटी प्रकरणी संबंधित असल्यामुळे त्यांना सायबर पोलीस स्टेशन विविध कलमा अतंर्गत अटक करण्यात आली आहे.

तसेच पुणे व ठाणे परिसरामध्ये नेमलेल्या पथकांनी संशयित संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्या हालचालीचा मागोवा घेऊन त्यांना त्यांची क्रेटा गाडी क्रमांक MH20 / EL ७१११ मधून ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत गाडीमध्ये प्रितीश देशमुख मिळून आले आहेत.

प्रितीश देशमुख हे जी ए सॉफ्टवेअर G.A. software या कंपनीचे संचालक असून त्यांच्या संस्थेतर्फे म्हाडाच्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत.

प्रितीश देशमुख यांच्या झडतीमध्ये त्यांच्या सोबत असलेल्या लॅपटॉपमध्ये म्हाडाच्या लेखी परीक्षेचे पेपर मिळून आले. तसेच त्यांच्यासोबत लिफाफ्यामध्ये पेन ड्राईव्ह मिळून आले असून त्यामध्येही म्हाडाच्या लेखी परीक्षेचे पेपरसेट आढळून आले आहे.

एकूण 6 आरोपींना अटक

या प्रकरणी संशयित आरोपी अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगाव राजा ता. सिंधखेडराजा, जिल्हा बुलढाणा), संतोष लक्ष्मण हरकळ (रा. सदर सद्या रा. मिलेनियम पार्क औरंगाबाद) आणि डॉ. प्रितीश देशमुख संचालक G.A software (रा. महिंद्रा अॅन्थिया, खराळवाडी पुणे) यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!