इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे सहा मेंढपाळांच्या सुमारे ४५ मेंढ्या मृत्यूमुखी
५० ते ६० मेंढ्या या आजारी असून त्या दगावण्याची शक्यता आहे.

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे सहा मेंढपाळांच्या सुमारे ४५ मेंढ्या मृत्यूमुखी
५० ते ६० मेंढ्या या आजारी असून त्या दगावण्याची शक्यता आहे.
इंदापूर ; बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे सहा मेंढपाळांच्या सुमारे ४५ मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. तर, सुमारे ५० ते ६० मेंढ्या या आजारी असून त्या दगावण्याची शक्यता आहे. यामुळे मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून नुकसान भरपाई मिळाण्याची मागणी या मेंढपाळांची आहे.
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येते पाटस आणि परिसरातील काही मेंढपाळ हे मेंढ्या घेऊन भटकंती करत होते. या सहा मेंढपाळांनी एका ठिकाणी काही दिवस वास्तव्य केले. परंतु, गेल्या काही दिवसांत या मेंढपाळांच्या मेंढ्या मरत आहेत. मेंढ्यांचे तोंड आणि कान सुजत आहेत. या सहा मेंढपाळांच्या सुमारे ४५ मेंढ्या मृत झाल्याची माहिती उपस्थितांनी दिली. तर, अनेक मेंढ्या आजारी असून त्यांचाही मृत्यू होण्याची शक्यता आहे.
लाखो रुपयांचे नुकसान
इतक्या मोठ्या संख्येने मेंढ्यांचा मृत्यू होत असल्याने मेंढपाळ हतबल झाले आहेत. एका मेंढीची किंमत सुमारे २० ते २५ हजार रुपये इतकी आहे. मेंढ्यांचा मृत्यू होत असल्याने मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने झालेल्या नुकसानीची दखल घेऊन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मेंढपाळ करीत आहेत.
मेंढ्यांवर औषधोपचार
मेंढ्या मृत्युमुखी पडत असल्याची माहिती मिळताच जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे आणि डॉक्टरांच्या टीमने सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. मेंढ्यांचा मृत्यू थांबण्यासाठी मेंढ्यांवर औषधोपचार करण्यात येत आहे. पशुवैद्यकीय डॉक्टरांची एक टीम सदर ठिकाणी कार्यरत आहे.
गेल्या काही दिवसांत कान आणि तोंड सुजून जवळपास ४५ मेंढ्या मृत्यमुखी पडल्या आहे . तर ५५ ते ६० मेंढ्या आजरी असून जगण्याची शक्यता नाही. एकूण सहा मेंढपाळांच्या या मेंढ्या आहेत. शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी प्रतिक्रिया नुकसान झालेले मेंढपाळ भगवान बोझू दगडे यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना दिली.
मृत मेंढ्यांची पाहणी केली आहे. मेंढ्यांच्या तोंडाला, डोळ्यांना सूज येत आहे. काही सॅम्पल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मेंढ्यांचे लिव्हर आणि किडनी यांचे नुकसान होत आहे. यानुसार औषधोपचार करण्यात येत आहे. हा संसर्गजन्य आजार नाही, यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. गवतातून विषबाधा झाली असल्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी दिली.
मदतीची मागणी
पाटसचे माजी सरपंच संभाजी खडके तसेच दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर शितोळे पाटील यांनी निमगाव केतकी येथे जाऊन या मेंढपाळ बांधवांना धीर दिला. तसेच, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांच्याशी चर्चा करून मेंढपाळ बांधवांना मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.