इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथे आढळले मांजराच्या दुर्मिळ प्रजातीतील रस्टी स्पॉटेड कॅट (वाघाटी) जातीचे पिल्लू
इंदापूर तालुक्यात पहिल्यांदाच वाघाटी जातीचे पिल्लू सापडल्याची माहिती
इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथे आढळले मांजराच्या दुर्मिळ प्रजातीतील रस्टी स्पॉटेड कॅट (वाघाटी) जातीचे पिल्लू
इंदापूर तालुक्यात पहिल्यांदाच वाघाटी जातीचे पिल्लू सापडल्याची माहिती
इंदापूर:सिद्धार्थ मखरे ( प्रतिनिधी )
बाभूळगाव (ता. इंदापूर) येथील गोपीनाथ गुरगुडे यांच्या ऊस फडात दि.२४ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्याची हुबेहूब लहान प्रतिकृती असणारे पिल्लू आढळून आले असता काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या संदर्भात गोपीनाथ गुरगुडे यांचे पुतणे दीपक गुरगुडे यांनी पिल्लाचे छायाचित्रे काढून इंदापूर वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांना पाठवले.
यानंतर काळे यांनी पुण्याचे वनसंरक्षक राहुल पाटील,सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे यांना या संदर्भातील माहिती कळवली तसेच पोलीस अधीक्षकांना त्याची कल्पना देऊन वनसंरक्षक कार्यालयाच्या सूचनेनुसार राहुल काळे यांनी वनपाल राहुल गीते,बी.एस खारतोडे यांना बाभूळगाव येथे पाठवले. पिल्लाची पाहणी केल्यानंतर ते रानमांजराच्या अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या वाघाटी या जातीचे असल्याचा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी काढला.या संदर्भातील माहिती देताना तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी लोकांना घाबरून जावू नये असे आवाहन केले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी – रानमांजराच्या दुर्मिळ प्रजातीपैकी रस्टी स्पॉटेड कॅट अर्थात वाघाटी आहे. वाघासारखी कातडी असलेले हे वाघाटी हे मांजर घरगुती मांजराच्या आकाराचे रानमांजर आहे. याचा रंग व अंगावरिल ठिपके हे बिबट्याप्रमाणेच असतात व बिबट्याची हुबेहुब लहान प्रतिकृती हे मांजर दिसते. याचा वावर भारतातील पूर्वेकडील राज्ये, ब्रम्हदेश, थायलंड, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा इत्यादी देशात आहे. कर्नाटक व केरळमधील सह्याद्रीच्या रांगात याचीच उपजात आढळून येते.