इंदापूर तालुक्यात 3 महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांना मान्यता
उच्च शिक्षणाची गरज ही तालुक्यातच पुर्ण होणार

इंदापूर तालुक्यात 3 महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांना मान्यता
उच्च शिक्षणाची गरज ही तालुक्यातच पुर्ण होणार
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यात चालू शैक्षणिक वर्षापासून 3 महाविद्यालयांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम सुरु करण्यास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नामुळे शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची गरज ही तालुक्यातच पुर्ण होणार आहे.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासक्रम अंतर्गत एम. एस्सी. इनऑरगॅनिक केमिस्ट्री, एम.एस्सी. मायक्रो बायोलॉजी, एम. एस्सी. (अनॅलिटिकल केमिस्ट्री), एम. एस्सी. (ऑरगॅनिक केमिस्ट्री). तर भिगवण येथील कला महाविद्यालयात बी.एस्सी आणि बी. कॉम अभ्यासक्रम नव्याने सुरू होत असून, बी.ए अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त तुकडीस मान्यता मिळाली आहे. बावडा येथील श्री शिवाजी एजुकेशन सोसायटी संचलित श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयामध्ये एम.ए. इतिहास, एम.ए.मराठी, बी.ए. अर्थशास्त्र, बी.ए. इंग्रजी, बी.ए. इतिहास,बी.ए. मराठी,वाणिज्य व व्यवस्थापन बी. कॉम. बैंकिंग अँड फायनान्स, बी.एस्सी. (कैमिस्ट्री),बी.एस्सी. (बॉटनी) या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नाने या विविध अभ्यासक्रमांना मान्यता मिळाल्याने त्यांचा सन्मान इंदापूर महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, भिगवण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव वाळुंज, बावडा महाविद्यालयाचे प्राचार्य लहु वावरे व प्राध्यापक वर्गाने पुष्पगुच्छ देऊन केला. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्याचा शिक्षणाचा एक वेगळा पॅटर्न तयार झाला असून, या अभ्यासक्रमाना मान्यता मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या उच्च शिक्षणाची उत्तम सोय इंदापूर तालुक्यामध्ये होणार आहे. विशेष म्हणजे सदरची तीनही महाविद्यालये तालुक्यामध्ये तीन वेगवेगळ्या भागांमध्ये असल्याने विद्यार्थिनींना घराजवळच उच्च शिक्षण मिळणार आहे.