इंदापूर नगरपरिषदेकडून चालू वर्षाकरिता १०७ कोटी रुपयांसह साडेचार लाखांचा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नसल्याने नागरिकांना दिलासा
इंदापूर नगरपरिषदेकडून चालू वर्षाकरिता १०७ कोटी रुपयांसह साडेचार लाखांचा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
▫️अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नसल्याने नागरिकांना दिलासा▫️
▫️स्विमिंग पूल व क्रिकेट स्टेडियसाठी तरतूद▫️
इंदापूर : प्रतिनिधी
सन २०२२-२३ या वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पासाठी इंदापूर नगरपरिषदेकडून सोमवारी (दि.१४) विशेष सभा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. यामध्ये चालू वर्षाकरिता १०७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पासह ४ लाख ४३ हजार ५५४ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
यामध्ये मागील वर्षाची १ कोटी २३ लाख ८८ हजार १८७ रक्कम शिल्लक असून सन २०२२-२३ मध्ये अंदाजे महसूली व भांडवली जमा १ कोटी ४६ लाख ६६ हजार ९२५ रक्कम अपेक्षित धरण्यात आलेली आहे. तसेच महसूली खर्च व भांडवली खर्च १०७ कोटी ६६ लाख ११ हजार ५५८ रुपये अपेक्षित धरण्यात आलेला आहे.
सदरच्या अंदाजपत्रकानुसार इंदापूर नगरपरिषद जुन्या ठिकाणाहून नवीन ठिकाणी स्थलांतरीत होणार असल्याने इंदापूर नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीच्या जाग्यावर बहुउद्देशीय उद्दान विकसित करणे प्रस्तावित आहे.त्यासाठी १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यातील १५ कोटी खर्च करणे प्रस्तावित आहे.शहरांमध्ये क्रिकेट स्टेडियम व स्विमिंग पूल करण्याच्या कामाकरिता १५ कोटी खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यासाठी ५ कोटी खर्च करणे प्रस्तावित आहे.त्याच बरोबर शहरात मंडई बाजारासाठी बाजार ओटे बांधकाम करणे प्रस्तावित आहे.
तसेच संपूर्ण शहरात महाराष्ट्र नगरोत्थान योजनेअंतर्गत भुयारी गटार करण्याकरीता ६५ कोटींचा खर्च अपेक्षित असून प्राथमिक अवस्थेतील खर्च प्रस्तावित आहे. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची थकीत पगार देणी व सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी व्यापारी गाळे येथील लिलाव उत्पन्न राखीव ठेवण्याचे ठरविण्यात आले आहे.
*विविध योजनांकरीता खर्च प्रस्तावित*
१५ वा वित्त आयोग १ कोटी ६० लाख, अल्पसंख्यांक अनुदान १० लाख, महाराष्ट्र नगरोत्थान योजना १० कोटी, रस्ता व विशेष रस्ता अनुदान ३ कोटी ७० लाख, सुजल निर्मल अभियान ५० लाख, नागरी दलित वस्ती योजना २ कोटी ५ लाख, वैशिष्ट्यपूर्ण योजना २५ कोटी, नागरी दलित्त्तेतर योजना २ कोटी, स्थानिक विकास निधी व खासदार फंड ५० लाख, अग्निशमन योजना १० लाख, स्वच्छ भारत अभियान १० कोटी, प्रधानमंत्री आवास योजना २ कोटी.
सदरील सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा होत्या. उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, सर्व विभागाचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका यांनी सभेच्या चर्चेमध्ये सहभाग घेतला. कामकाजाअंती नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत करून सर्वांचे आभार मानले.