इंदापूर पोलीसांची वाळू माफियांवर धडक कारवाई; ५६ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
इंदापूर पोलिसांच्या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक

इंदापूर पोलीसांची वाळू माफियांवर धडक कारवाई; ५६ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
इंदापूर पोलिसांच्या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील मौजे कांदलगाव येथे वनखात्याच्या जमिनीवर अनाधिकाराने गौणखनिजाचा साठा करून चढ्या दराने विकणाऱ्या वाळूमाफियावर इंदापूर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ५६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकास ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी पो.कॉ.गजेंद्र महादेव बिरलिंगे यांनी इंदापूर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून पोलीस कर्मचाऱ्यांसह गेले असता इंदापूर तालुक्यातील मौजे कांदलगाव हद्दीत वनखात्याच्या जमिनीवर शिलाजीत सोनवणे नावाचा व्यक्ती शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदा व विनापरवाना गौखनिजाचा साठा करून तो चढ्या दराने पुणे सोलापूर येथे पाठवीत असताना दि.६ रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास धाड टाकली. त्यावेळी शिलाजीत सोनवणे,उजनी जलाशयात अनधिकृत वाळू उत्खनन करणारा अज्ञात बोट सेक्शन मालक,ट्रक नंबर एमएच ४२/टी ००९९ वरील अज्ञात चालक,पराडे पाटील असे लिहलेली सहा टायर एल पी ट्रक वरील अज्ञात चालक हे धाड पडताच सैरावैरा पळून गेले. व यावेळी घटनास्थळावरून जेसीबी चालक विनोद प्रल्हाद नागझरे ( वय २९ वर्षे, रा.ब्राह्मण मळा ता.औढा. जि. हिंगोली सध्या रा.हिंगणगाव ता.इंदापूर ) हा जागीच मिळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून सुमारे ५६ लाख ७५ हजार किंमतीचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला आहे.
सदर ठिकाणाहून पोलिसांनी १ लाख २० हजार रुपये किंमतीची २० ब्रास वाळू , २५ लाख रुपये किंमतीचा एक पिवळ्या रंगाचा जेसीबी , ३० लाख रुपये किंमतीचा सहा टायर ट्रक नं.एमएच ४२ टी ००९९ व यामधील ३० हजार रुपये किंमतीची ५ ब्रास वाळू, २५ हजार रुपये किंमतीचे १५ लोखंडी पाईप व २ पीव्हीसी पाईप ( जागीच तोडून नाश केले ) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यांचे विरुद्ध भा.द. वि क.४३९,३७९,४११,३४ सह पर्यावरण अधिनियम कलम ९ ,१५ सह भारतीय वन अधिनियम सन १९२७ चे कलम २६ ( १ ) व गौण खनिज कायदा कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार दिपक पालके हे करीत आहेत.
सदरच्या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले की, उजनी जलाशयातून अनधिकृत वाळू या गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई करण्यात येणार आहे.