इंदापूर महामार्ग पोलिसांकडून रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रथा द्वारे जनजागृती
नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या केल्या सूचना
इंदापूर महामार्ग पोलिसांकडून रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रथा द्वारे जनजागृती
नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या केल्या सूचना
इंदापूर:सिद्धार्थ मखरे ( प्रतिनिधी )
बत्तीसावा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान संपूर्ण राज्यभर राबवण्यात येत असून इंदापूर महामार्ग पोलीस मदत केंद्राकडून देखील वाहतुकीचे नियम व सुरक्षित प्रवासाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी इंदापूर महामार्ग पोलीस मदत जनजागृती रथ बनवला असून पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी इंदापूर महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.व्ही.भुसनूर,स.पो.निरीक्षक धनवे,स.पो.उप निरिक्षक विठ्ठल कदम,पो.काॅ.माने, पो.ना.विनोद मिसाळ,पो.कॉ गवळी,पो.ना.बनसोडे,पो.ना.जगताप,पो.ना.कदम यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रवीण माने म्हणाले की,आपण पाच दहा हजार किंमत असणाऱ्या मोबाईल ला स्क्रीन गार्ड लावू-लावू जपतो मात्र ज्याची किंमत होऊ शकत नाही अशा देहाची काळजी घेत नाही. जर मोबाईल वर एवढे प्रेम करतो तर डोक्यावर हेलमेट का घालत नाही ? हेलमेट ही काळाची गरज आहे.तुम्ही फक्त तुमच्या परिवारापुरते मर्यादीत नाही तर तुमचा उपयोग गावाला,शहराला समाजाला होत असतो.जर तुम्हाला इजा पोहचली तर याचा परिणाम या सर्व घटकांवर होत असतो. म्हणून आपण आपल्या बरोबर समाजाची काळजी घेणे देखील महत्वाचे झाले आहे. महामार्ग पोलीस मदत केंद्र इंदापूर यांनी महामार्ग सुरक्षा सप्ताह हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला असून माने यांनी संपूर्ण पोलीस विभागाचे कौतुक केले.
या मदत केंद्राच्या माध्यमातून दि.१८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालखंडात इंदापूर तालुक्यासह पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन करण्यासाठी इंदापूर महामार्ग पोलीस मदत केंद्राने फिरता रथ बनवला असून “सडक सुरक्षा – जीवन सुरक्षा” या घोषवाक्यानुसार अपघाताच्या ठिकाणी पोलीस अधिकारी/अंमलदार येवुन जखमी इसमास जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवतील याची वाट न पाहता आपण जखमी इसमास हॉस्पिटलमध्ये त्वरीत हलवावे. कोणत्याही प्रकारची मनामध्ये शंका न बाळगता किंवा पोलीस काही विचारपुस करतील याची मनात भिती न बाळगता अपघातात जखमी झालेल्या इसमास मदत करण्यास प्रत्येक नागरिकांने दक्ष असावे.आपली या मदतीच्या कार्याची प्रशंसाच होईल.अपघाताप्रकरणी मनामध्ये शंका न बाळगता अपघात ज्या ठिकाणी घडला आहे. त्या बाबतची माहिती संबंधीत पोलीस स्टेशन किंवा महामार्ग पोलीसांना विनाविलंब कळवावी. हे कर्तव्यदक्ष नागरिकांचे कर्तव्य आहे.जेणेकरुन अपघात व्यक्तींना वेळेवर मदत पोहोचू शकेल.अशा रहदारी विषयक सुचना महामार्ग पोलीस मदत केंद्राकडून करण्यात आल्या आहेत.
याचसोबत अंमली पदार्थाचे सेवन करुन वाहन चालवू नका,चार चाकी वाहन चालवताना सीटबेल्ट चा वापर करावा,आपले वाहन महामार्गावर भरधाव वेगाने चालवू नका,बस ट्रक कंन्टेनर नेहमी रोडच्या डाव्या बाजूने चालवावे,टेल लाईट, हेड लाईट तपासून पहावे,वाहनाच्या मागील बाजूस परावर्तक लावावेत यांसह विविध मार्गदर्शक सुचना या रथाव्दारे वाहनचालकांना करण्यात आल्या आहेत.