इंदापूर येथील ग्रामदैवत इंद्रेश्वर चषक स्पर्धेतील अंतिम सामना मोहम्मद अजहरुद्दिन यांच्या उपस्थितीत संपन्न
मोहम्मद अजहरुद्दिन यांचे इंदापुरात जंगी स्वागत
इंदापूर येथील ग्रामदैवत इंद्रेश्वर चषक स्पर्धेतील अंतिम सामना मोहम्मद अजहरुद्दिन यांच्या उपस्थितीत संपन्न
मोहम्मद अजहरुद्दिन यांचे इंदापुरात जंगी स्वागत
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहरातील इंगुले मैदान येथे (दि.८) फेब्रुवारी पासून कै.डॉ. लालासाहेब रामचंद्र कदम यांच्या स्मरणार्थ ग्रामदैवत इंद्रेश्वर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने करण्यात आले होते.त्याचा समारोप (दि.२१) रोजी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दिन यांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला.
यावेळी मोहम्मद अझहरुद्दीन यांचे इंदापूर नगरीत आगमन होताच इंदापूर नगरी क्रिकेटमय झाली. त्यांचे मैदानावर आगमन होताच हलगीच्या कडकडाटासह फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये जंगी स्वागत करण्यात आले. अझहरुद्दीन यांचे मंचावर आगमन होताच क्रिकेट रसिकांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.तसेच क्रिकेट रसिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळाला.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात वीर विजय अकलूज संघाने विजय मिळवला तर आंबेगाव संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजी दाखवल्यामुळे मालिकावीराचा सन्मान विशाल निघोट यांना दुचाकी गाडी देऊन मोहम्मद अझरुद्दीन यांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेतील अंतिम दिवसाचे मुख्य आकर्षण ठरले ते भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दिन व संपूर्ण महाराष्ट्रात बिली बॉडन नावाने परिचित असणारे डान्सिंग अंपायर शंकर उर्फ (गोट्या) धोत्रे.
यावेळी मोहम्मद अजहरुद्दिन आयोजकांच्या केलेल्या उत्कृष्ट नियोजनावर खुश होऊन म्हणाले की मी इंदापूरला पुन्हा येईन.