
इंदापूर येथे विहिरीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह
इंदापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे सोलापूर मार्गांलगत असणाऱ्या विहिरीत बुधवारी (दि.१५) अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे.याबाबत सागर शेखर गानबोटे (रा. गानबोटे कॉम्प्लेक्स, इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
सागर शेखर गानबोटे हे बुधवारी (दि.१५) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या जमीन गट नंबर २५५/८१५ यामध्ये विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले होते. मोटार चालू केल्यानंतर त्यांना विहिरीमध्ये अनोळखी पुरुषाचा मृतदेह पालट्या अवस्थेत तरंगताना दिसला. त्यानंतर त्यांनी याबाबत चुलत भाऊ राकेश हनुमंत गानबोटे यांना भ्रमणध्वनी करून कळवले असता ते घटनास्थळी आले. व त्यांनी ते पहिल्यानंतर इंदापूर पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर इंदापूर पोलीसांनी सदर ठिकाणी जाऊन नागरिकांच्या मदतीने दोरीच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढून पुढील तजबीजेसाठी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे.याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार बी. बी जाधव हे करीत आहेत.