इंदापूर शहर गुन्हेगार मुक्त करायचं आहे – पोलीस निरीक्षक तयूब मुजावर
तक्रार निवारण दिनाच्या कार्यक्रमात केले विविध विषयांवर भाष्य

इंदापूर शहर गुन्हेगार मुक्त करायचं आहे – पोलीस निरीक्षक तयूब मुजावर
तक्रार निवारण दिनाच्या कार्यक्रमात केले विविध विषयांवर भाष्य
इंदापूर : प्रतिनिधी
तक्रार निवारण दिनाच्या अनुषंगाने इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तयूब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन या ठिकाणी प्रमुख पोलीस अधिकारी,बिट अंमलदार,कर्मचारी तसेच तालुक्यातील सर्व पोलीस पाटील,महिला दक्षता समितीच्या सदस्यांच्या समवेत गुरुवारी ( दि.९ ) कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक तयूब मुजावर म्हणाले की,कायदा सुव्यवस्था राखण्यास पोलीस कटीबद्ध असून इंदापूर शहर व परिसर गुन्हेगार मुक्त करायचं आहे.
इंदापूर शहराचे व शहरातील मालमत्तेचे संरक्षण करणे पोलिसांची जबाबदारी असून दररोज गस्तीसाठी पाच गाड्या फिरत आहेत.इथून पुढे तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची गुन्ह्यानुसार वर्गवारी करून त्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे. माघील काही दिवसांपूर्वी डिझेल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी इंदापुरात काही दिवस वास्तव्यास होते.त्यामुळे जे नागरिक भाडेकरू म्हणून इंदापूर शहरात राहतात त्यांची माहिती घरमालकाने पोलिसांना देणे अनिवार्य आहे.जर माहिती दिली नाही आणि सदरील व्यक्तींकडून काही गुन्हे घडले तर त्या गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार घर मालकांना जबाबदार धरले जाईल.
किशोरवयीन मुली व महिलांचे काही विषय गांभीर्याने घेणे गरजेचे असून त्यावर समुपदेशन करणे गरजेचे आहे.भ्रमणध्वनीचा उपयोग ऑनलाइन शिक्षणासाठी महत्वाचा आहे परंतु त्याचा गैरवापर टाळला पाहिजे.
गणेशोत्सव काळासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे अन्यथा नियमांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा याप्रसंगी मुजावर यांनी दिला.
प्रसंगी नगराध्यक्षा अंकिता शहा,मा.नगरसेवक प्रशांत शिताप,पत्रकार जितेंद्र जाधव,महिला दक्षता समितीच्या सदस्या सायरा आत्तार,सीमा कल्याणकर,नगरसेवक अनिकेत वाघ यांनी सूचना मांडल्या.
यावेळी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने,सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे,पोलीस हवालदार प्रवीण भोईटे,महिला दक्षता समितीच्या पोलीस हवालदार माधुरी लडकत,पोलीस हवालदार अमोल खैरे,पोलीस कर्मचारी,पोलीस पाटील व इतर उपस्थित होते.