उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मातोश्रींना आदर्श माता पुरस्कार प्रदान
"शरद पवारांनी अजित पवारांना उभे केले. सुरुवातीला ग्रामपंचायत, कारखाना त्यानंतर बँक आणि आता प्रत्यक्ष राजकारणातील निवडणूक असा त्याचा प्रवास आहे"

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मातोश्रींना आदर्श माता पुरस्कार प्रदान
“शरद पवारांनी अजित पवारांना उभे केले. सुरुवातीला ग्रामपंचायत, कारखाना त्यानंतर बँक आणि आता प्रत्यक्ष राजकारणातील निवडणूक असा त्याचा प्रवास आहे”
बारामती वार्तापत्र
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूस्, पुण्याच्या डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने तिसरा आदर्श माता पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई अनंतराव पवार यांना बारामती येथील त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला.यावेळी आशाताई म्हणाल्या की “माझ्या मुलांना चांगले वळण लावत मी धाकासोबतच प्रेमाने वाढविले. आमचे सासर आणि माहेरचे कुटुंब मोठे असल्याने भरलेल्या गोकुळात माझे आयुष्य गेले. दिवाळीत आम्ही सगळे एकत्र येतो. शरद पवारांनी अजित पवारांना उभे केले. सुरुवातीला ग्रामपंचायत, कारखाना त्यानंतर बँक आणि आता प्रत्यक्ष राजकारणातील निवडणूक असा त्याचा प्रवास आहे”, असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवनपट सांगताना त्यांच्या मातोश्री आशा पवार यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
हा पुरस्कार ऑनलाईन पद्धतीने झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या होत्या.
बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, गणराज्य संघाच्या अध्यक्षा सुषमा अंधारे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. मनोज चासकर, कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराचे यंदा तिसरे वर्ष असून संस्थेच्या खजिनदार सुरेखा सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हा विशेष सोहळा आयोजित करण्यात येतो