कोरोंना विशेष

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील ‘कोरोना’ व्यवस्थापन व नियोजनाचा आढावा.

'कोरोना'च्या रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत याची दक्षता घ्या - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील ‘कोरोना’ व्यवस्थापन व नियोजनाचा आढावा.

‘कोरोना’च्या रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत याची दक्षता घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश.

■ मृत्यूदर रोखण्यासोबत ‘कोरोना’चा संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घ्या
■ गणेश विसर्जन घरगुती स्वरुपातच करा
■ ‘कोरोना’चा परिणाम विकास कामांवर होऊ देऊ नका
■ ‘कोरोना’सह अन्य संसर्गाच्या रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध करा
पुणे दि. 21 : पुणे, पिंपरी-चिंचवड महानगर पालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात ‘कोरोना’ रुग्णदर व मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देवून ‘कोरोना’च्या रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

 

विधानभवन सभागृहात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील ‘कोविड व्यवस्थापन व नियोजना’बाबत बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ‘आयसर’चे अर्नब घोष व डॉ. आरती नगरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, ससूनचे प्रभारी अधीष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कोणत्याही परिस्थितीत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना संसर्गावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, यासाठी सर्वांनी विशेष लक्ष देऊन काम करावे. तसेच कोरोनाबरोबरच पावसाळयातील अन्य संसर्गाचे आजार व सारी आजाराच्या रुग्णांवर वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
पुण्यातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूकीला मोठी परंपरा आहे. परंतु यावर्षी कोरोनाची महामारी असल्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरातल्या गणपतींचे घरातच तर सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्तींचे विसर्जन देखील साधेपणाने करणे गरजेचे आहे. यासाठी कोणीही सार्वजनिक विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी करु नये. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मानाचे गणपती व अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी कोणालाही परवानगी देता येणार नाही, याची पोलीस विभागाने दक्षता घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
कोरोनाच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील विकासाचे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रखडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पुरंदर विमानतळाचे काम लवकरात लवकर सुरु होऊन गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे काम मार्गी लागण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे सांगून पुणे मेट्रोसह जिल्हयातील महत्वपूर्ण प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, गणेशोत्सव कालावधीत गणेश विसर्जनाबाबत सार्वजनिक गणेश मंडळांना विश्वासात घेऊन पोलीस विभाग व महापालिका प्रशासनाने योग्य ते नियोजन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता घरगुती स्वरुपात विसर्जन करणे, तसेच फिरते विसर्जन हौदाची व्यवस्था करणे तसेच गणेश मुर्तीं दान केंद्रे स्थापन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोना बाधित रुग्णांची सद्यस्थिती, कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या, बाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती, नमुना तपासणी प्रयोगशाळा, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी, तपासण्यात आलेल्या बिलांचे व्यवस्थापन, बेड व्यवस्थापन आदि विषयी माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील ‘कोरोना’ स्थितीची माहिती दिली. ग्रामीण भागात अँटीजेन टेस्ट वाढविण्यात येत असल्याचे सांगितले तसेच ज्येष्ठ नागरिक व सहव्याधीग्रस्तांच्या तपासणीवर भर देवून रुग्णदर, मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून यामुळे ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईल, असे त्यांनी सांगितले.
‘आयसर’चे अर्नब घोष व डॉ. आरती नगरकर यांनी कोरोना विषयी सादरीकरण केले. जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील तसेच इतर उपस्थित अधिका-यांनी आपल्या विभागात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram