उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाव मराठा आंदोलन
बारामतीत शनिवारी (ता. 26) सकाळी 9 ते 11 या वेळेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाव मराठा आंदोलन केले जाणार आहे.
बारामती वार्तापत्र
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभर मराठा समाजाच्या वतीने आंदोलन केली गेली. या मध्ये राज्य शासनावर सर्वाधिक रोष असून त्यातूनच राज्य मंत्रीमंडळातील मंत्री, आमदार खासदार यांच्या निवासस्थानासमोर राज्यभरात आंदोलने झाली.
याचाच एक भाग म्हणून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील भिगवण रस्त्यावरील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानासमोर शनिवारी बारामती शहर व बारामती तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांकडून ढोल वाजवून आंदोलन केले जाणार आहे. हे आंदोलन करताना पोलिस प्रशासनाचे नियम, कोरोनाच्या दृष्टीने आवश्यक सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा तसेच वेळोवेळी सॅनेटायझरचा वापर करणे या बाबी पाळणे बंधनकारक असल्याचे या बाबतच्या आवाहनात नमूद केले आहे. मराठा समाजावर अन्याय होतो आहे, तरीही आपण कायदा व सुव्यवस्था त्याचसोबत स्वतःची व सामाजिक स्वास्थ्याची जबाबदारी घेत हे आंदोलन करायचे असल्याचे या बाबतच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.