उपमुख्यमंत्री अजित पवारांसह उदय सामंत यांची गाडी चालवून फेमस झाली; तिच आता जेलमध्ये गेली, कांड करणारी महिला पोलीस निलंबित
9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवारांसह उदय सामंत यांची गाडी चालवून फेमस झाली; तिच आता जेलमध्ये गेली, कांड करणारी महिला पोलीस निलंबित
9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवारांसह उदय सामंत यांची गाडी चालवून प्रकाशझोतात आलेल्या महिला पोलीस कर्मचारी तृप्ती मुळीक यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तृप्ती मुळीक या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी आहेत.
नरबळी आणि जादूटोण्याच्या नावाखाली 85 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तृप्ती मुळीक यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती, यानंतर तिला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधिक्षकांनी तृप्ती मुळीक यांचं निलंबन केलं आहे.
तृप्ती मुळीक या सिंधुदुर्ग पोलीस अंमलदार होत्या. कोल्हापूरच्या सुभाष हरी कुलकर्णी यांनी 3 नोव्हेंबरला आपली फसवणूक झाल्याची तक्रार केली होती, त्यानंतर पोलिसांनी 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला, यामध्ये तृप्ती मुळीक यांचाही समावेश होता. या गुन्ह्यात तृप्ती मुळीक या 6 नंबरच्या आरोपी आहेत.
तृप्ती मुळीक सोबतच दीपक पाटणकर, अण्णा उर्फ नित्यानंद नायक, धनश्री काळभोर, शशिकांत गोळे, कुंडलिक झगडे, ओमकार पाटणकर, भारत पाटणकर, हरीश राऊत यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्यांवर नरबळी, जादूटोणा आणि इतर अघोरी प्रकार करून 84 लाख 69 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या सगळ्यांनी 24 लाख 85 हजारांचे सोन्याचे दागिने, 2 लाख 80 हजारांचे चांदीचे दागिने आणि इतर किंमती वस्तू, 54 लाख 84 हजार रुपये रोख रक्कम आणि आरटीजीएस रक्कम, 2 लाख रुपयांच्या लाकडी आणि किमती वस्तू, 20 हजार रुपयांची परवाना असलेली बंदूक इत्यादी दबाव टाकून घेतल्याचा आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला गेला, यानंतर कोल्हापुरातल्या न्यायालयाने तृप्ती मुळीक यांना पोलीस कोठडी सुनावली.