स्थानिक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती बस स्थानकात सुरक्षेचा अभाव

दिवसभरात एक हजार बसची वाहतूक होते

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती बस स्थानकात सुरक्षेचा अभाव

दिवसभरात एक हजार बसची वाहतूक होते

बारामती वार्तापत्र

शहर आणि जिल्ह्यातील १४ आगारांमधील ४२ बसस्थानकांचे लेखापरीक्षण करण्यात आले असून यामध्ये घटना घडलेल्या स्वारगेट बसस्थानकासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती शहरातील बस स्थानकामध्येही सुरक्षारक्षकांची कमतरता असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या बलात्कारानंतर बस स्थानकांमधील सुरक्षिततेचा प्रश्च चर्चेत आला. या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘एसटी’ महामंडळाच्या बस स्थानकांचे सुरक्षाविषयक लेखापरीक्षण करण्यासाठी समिती स्थापन करून सात दिवसांत अहवाल देण्याचा आदेश दिला. त्यानुसार, पुणे ‘एसटी’ विभागात त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. सुरक्षा अधिकारी, विभागीय वाहतूक अधिकारी आणि आगार व्यवस्थापक यांचा या समितीमध्ये समावेश होता.

पुणे शहरातील स्वारगेट आणि वाकडेवाडी या प्रमुख बस स्थानकांसह अन्य स्थानकांवर सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षक वाढविण्याची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. स्थानकातील सुरक्षाव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, विद्युत व्यवस्था, सुरक्षारक्षक कर्मचारी आदींबाबत समाधानकारक उपाययोजना नसल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.

स्वारगेट आणि वाकडेवाडी या प्रमुख बसस्थानकांवर प्रत्येकी २४ सुरक्षारक्षक असून, या स्थानकांवरून होणारी दैनंदिन बस वाहतूक, प्रवाशांची संख्या पाहता ही सुरक्षायंत्रणा कमी असल्याचे आढळून आले आहे. तालुका स्तरावरील ग्रामीण बस स्थानकांवरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असून, विद्युतपुरवठा आणि प्रकाश व्यवस्थेचा अभाव असल्याचे समितीने म्हटले आहे. स्थानकाच्या परिसरात सुरक्षा भिंतींचा अभाव आहे. ज्या ठिकाणी भिंती आहेत, त्यांची उंची कमी असल्याने बस स्थानकात सहज प्रवेश होऊ शकतो, अशा गंभीर बाबीही अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, बारामती मध्यवर्ती बस स्थानकातही या उणिवा असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. ‘बारामती शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातून दिवसभरात एक हजार बसची वाहतूक होते. स्वारगेट, वाकडेवाडी बसस्थानकांपेक्षा सर्वाधिक ४६ सीसीटीव्ही बारामती बस स्थानकात आहेत, तर १५ सुरक्षारक्षक आहेत. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने ही संख्या अपुरी आहे,’ असे बारामतीचे आगार व्यवस्थापक रविराज घोगरे यांनी सांगितले.

बस स्थानकांचा आढावा

  • पुणे जिल्ह्यातील आगार : १४
  • पुणे जिल्ह्यातील बस स्थानके : ४२
  • सुरक्षारक्षक : १८०
  • सीसीटीव्ही : ४०५

बारामती स्थानकात नव्याने पाच सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यासंदर्भात दोन वेळा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. मात्र, अद्याप त्यांची नियुक्ती झालेली नाही. -रविराज घोगरे, आगार व्यवस्थापक, बारामती

सुरक्षाविषयक लेखापरीक्षण अहवालानुसार गर्दी असलेल्या बस स्थानकांच्या ठिकाणी सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या आहेत. -प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, ‘एसटी’ महामंडळ, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!