एमपीएससी पूर्व परीक्षा आता 21 मार्चला होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पूर्वनियोजित 14 मार्चला होणारी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला होता

एमपीएससी पूर्व परीक्षा आता 21 मार्चला होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पूर्वनियोजित 14 मार्चला होणारी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला होता
मुंबई ; बारामती वार्तापत्र रिपोर्ट
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी MPSC पूर्व परीक्षा आता 21 मार्चला होणार (MPSC Exam New Date) आहे. पूर्वनियोजित 14 मार्चला होणारी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वचन दिल्याप्रमाणे, आज MPSC ने परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे.
एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचा उद्रेक झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज परीक्षेची तारीख जाहीर करणार असल्याचं गुरुवारी संध्याकाळी केलेल्या संबोधनात सांगितलं होतं. मात्र हे सांगत असताना शासकीय यंत्रणा आणि तिच्या तयारीवर उद्धव ठाकरेंनी प्रकाश टाकला. आज तारीख जाहीर होऊन येत्या आठ दिवसांत ही परीक्षा होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आज परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 21 मार्चला ही परीक्षा होणार आहे.
आठ दिवसात परीक्षा कशी होणार, मुख्यमंत्री काय म्हणाले?
येत्या आठ दिवसांत ही परीक्षा घेणारच, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ही घोषणा करताना शासकीय यंत्रणा आणि तिच्या तयारीपद्दलही मुख्यमंत्री बोलले. मग ही परीक्षा होताना शासकीय यंत्रणेची परीक्षेची तयारी, सुपरव्हिजन करणारे शिक्षक, वर्गखोल्या, त्यात सुरु असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आदी विषयांवर मुख्यमंत्री बोलले.
आपल्याला कल्पना असेल या परीक्षेला संपूर्ण शासकीय यंत्रणा लागते. विद्यार्थ्यांची सोय करण्यापासून पेपर गोळा करुन गठ्ठे बांधण्यापर्यंत नियोजन करावं लागतं.त्यासाठी कर्मचाऱ्यांची तयारी करुन घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा राक्षस पुन्हा डोकं वर काढतोय. त्यामुळे जे कर्मचारी परीक्षेसाठी काम करणार आहेत त्यांची टेस्ट केली जाणं महत्त्वाचं आहे. ज्यांना लस दिली गेली तेच कर्मचारी यासाठी काम करतील, असा माझा आग्रहच नाही तर सूचना आहे. विद्यार्थी परीक्षेत आल्यानंतर कोणत्याही दडपणात राहू नयेत’, अशी सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.
एमपीएससी परीक्षेच्या तारखेकडे संपूर्ण विद्यार्थ्यांसह राज्याचं लक्ष
आज जाहीर होणाऱ्या परीक्षेच्या नव्या तारखेकडे राज्यातील विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं. आपला पाल्य जरी परीक्षेची तयारी करत असला तरी पालकांची देखील यामध्ये संयमाची परीक्षा असते. त्यामुळे साहजिकच परीक्षेच्या तारखांचा पालकांवरही परिणाम होत असतो.
मुख्यमंत्र्यांकडून दिलगिरी व्यक्त
काही जणांची अडचण वेगळी आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला परवानगी दिली आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादाची अट येणार नाही. आपली थोडीसी गैरसोय झालीय याबाबत मी दिलगीरी व्यक्त करतो. हा चार-पाच दिवसांचा काळ लागतोय तो केवळ आपल्या पाल्याच्या आरोग्यासाठी लागत असल्याचं सांगत, मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन केलं आहे.
चौथ्यांदा परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची ही पहिली किंवा दुसरी वेळ नव्हती. सलग चौथ्यांदा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. कोरोनाचं कारण पुढे करत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतल्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला.