बारामती व शिरूर तालुक्यातील सरपंच पदाच्या निवडींना ब्रेक
उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या याचिकेनुसार 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती

बारामती व शिरूर तालुक्यातील सरपंच पदाच्या निवडींना ब्रेक
उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या याचिकेनुसार 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती
बारामती वार्तापत्र
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा जल्लोश थांबतो ना थांबतो तोच आता बारामती व शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतीची सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी स्थगित करण्यात आल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील एकूण 746 ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीसाठी पहिली सभा घेतली जाते व त्यामध्ये सरपंच व उपसरपंच पदाची निवड केली जाते. या निवडी आता शिरूर व बारामती तालुक्यातील सोळा तारखेपर्यंत स्थगित ठेवण्यात आलेल्या आहेत.
बारामती तालुक्यातील निंबुत व शिरूर तालुक्यातील शिक्रापूर या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या निवडीविषयी मा.उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका दाखल झाल्या होत्या.
या याचिकेच्या सुनावणी वर उच्च न्यायालयाने सदर याचिकाकर्त्यांना मंगळवारी नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी पुणे यांच्यासमोर उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आले आहे व नऊ आणि दहा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सरपंच ,उपसरपंच पदाच्या निवडी न घेता त्या 16 फेब्रुवारी 2021 पर्यंत रोखून ठेवण्यात यावेत असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हाधिकारी पुणे हे काय निर्णय घेतात याकडे शिरूर व बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे.
या दोन तालुक्यातील दोन ग्रामपंचायती मुळे दोन्ही तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी 16 फेब्रुवारीपर्यंत राखून ठेवण्यात येत आहेत असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र हे दोन तालुके वगळता अन्य तालुक्यातील सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी 9 आणि 10 तारखेला होणार आहेत.