कर्जत नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु,राम शिंदे यांना मोठा धक्का
रोहित पवार यांच्या खेळीमुळे भाजप शहराध्यक्ष वैभव शहा यांची पत्नी राखी शहा यांच्यासह नीता कचरे, पूजा कचरे, नजमा बागवान, सुनंदा पिसाळ या भाजप उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु,राम शिंदे यांना मोठा धक्का
रोहित पवार यांच्या खेळीमुळे भाजप शहराध्यक्ष वैभव शहा यांची पत्नी राखी शहा यांच्यासह नीता कचरे, पूजा कचरे, नजमा बागवान, सुनंदा पिसाळ या भाजप उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय.
कर्जत;प्रतिनिधी
कर्जत नगर पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री, भाजप नेते राम शिंदे यांच्यात जोरदार सामना रंगताना दिसत आहे. दरम्यान, कर्जत नगर पंचायत निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. अशावेळी रोहित पवार यांनी राम शिंदेंना पुन्हा एकदा जोरदार दणका दिलाय. रोहित पवारांच्या खेळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलाय. तर तीन ठिकाणी उमेदवार बदलण्याची नामुष्की भाजपवर आलीय.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. अशावेळी राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवार यांच्या खेळीमुळे भाजप शहराध्यक्ष वैभव शहा यांची पत्नी राखी शहा यांच्यासह नीता कचरे, पूजा कचरे, नजमा बागवान, सुनंदा पिसाळ या भाजप उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. भाजपच्या उमेदवारांवर दबाव आणून त्यांना अर्ज मागे घ्यायला लावला जात असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. यावरुन शिंदे आणि निवडणूक अधिकारी यांच्या शाब्दिक चकमकही झाली. त्यानंतर शिंदे यांनी कर्जतचं ग्रामदैवत असलेल्या गोधड महाराजांच्या मंदिरासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.
17 पैकी 17 जागा आम्हीच जिंकणार, रोहित पवारांचा दावा
रोहित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. तर शिंदे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते सर्व ताकद लावून कामाला लागले आहेत. दरम्यान, या निवडणुकीत विजय आमचाच होणार, नगर पंचायतीच्या 17 पैकी 17 जागा आम्हीच जिंकणार, असा दावा रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. तसंच राजकिय हित आणि राजकारण करणाऱ्या लोकांच्या मागे लोक कधीही उभे राहत नाहीत, असा टोलाही त्यांनी शिंदे यांना लगावला.
राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका
दुसरीकडे राम शिंदे हे मागील 10 वर्ष या मतदारसंघाचे आमदार होते. तसेच भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होतेय. या काळात मतदारसंघात मी अनेक विकासाची कामे केली. मात्र, मागील दोन वर्षांपासून कुठलंही काम या मतदारसंघात झालं नाही, अशी टीका शिंदे यांनी रोहित पवारांवर केलीय. तसेच आपण केलेल्या कामाच्या जोरावर आणि लोकांच्या विश्वासावर जनता भाजपला बहुमत दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
कर्जत नगर पंचायतीत सध्या काय स्थिती?
भाजप :12
राष्ट्रवादी : 0
काँग्रेस : 4
शिवसेना : 0
अपक्ष : 1
एकूण सदस्य संख्या : 17
नामदेव राऊतांच्या प्रवेशानं राष्ट्रवादीचं पारडं जड?
मागील नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं खातही उघडलं नव्हतं. मात्र, ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी निवडणुकीपूर्वीच रोहित पवारांनी मोठी खेळी खेळलीये. राम शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांना फोडून राष्ट्रवादीच्या गोटात शामिल केलं आहे. कर्जत नगरपंचायत निवडणूकही नामदेव राऊत यांच्या भोवती फिरते. कारण, मागील 25 वर्षंपासून राऊत यांचंच कर्जत शहरावर मोठं वर्चस्व आहेय. त्यामुळे राऊत यांना राष्ट्रवादीत शामिल करून घेतल्याशिवाय ही निवडणूक रोहित पवारांसाठी सोपी नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत राऊत यांची महत्वाची भूमिका असणार आहे. काही दिवसांपूर्वी राऊत भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झाले. तर दोन वर्षात रोहित पवारांच्या कामाचा वेग पाहता विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक गाजणार आहे. रोहित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची सत्ता येईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केलाय.