कालठन नं.१ ग्रामपंचायतीचा निर्णय; शंभर टक्के कर भरणाऱ्यांना मोफत दळण व शुद्ध पाणी
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून निर्णयाची अंमलबजावणी सुरू
कालठन नं.१ ग्रामपंचायतीचा निर्णय; शंभर टक्के कर भरणाऱ्यांना मोफत दळण व शुद्ध पाणी
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून निर्णयाची अंमलबजावणी सुरू
इंदापूर : सिद्धार्थ मखरे ( प्रतिनिधी )
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधूूूून ग्रामपंचायतीचा शंभर टक्के कर भरणा-या खातेदाराना आरओ चे पाणी देण्याचा व मोफत दळण देण्याचा निर्णय कालठण नं.१ या ग्रामपंचायतीने घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.
कालठण नं.१ चे माजी सरपंच विठ्ठल काळू सपकळ यांच्या हस्ते व कर्मयोगी सहकारीचे माजी उपाध्यक्ष भागवत गटकूळ,सरपंच सोनाली जाधव,संदीप जाधव, इंदापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक हनुमंतराव जाधव व इतर मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले.
इंदापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक हनुमंतराव जाधव यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली.त्यासाठी त्यांनी स्वखर्चाने ग्रामपंचायतीस पिठाची गिरणी उपलब्ध करुन दिली.यावेळी बोलताना जाधव म्हणाले की,पाटोदा गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या कामाचे कौतुक सर्वत्र होते.दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळतो,ही बाब आमच्या सारख्या सार्वजनिक क्षेत्रात काम करणा-या कार्यकर्त्यांना प्रेरणा देते. त्यामुळे ग्रामपंचायतीचा शंभर टक्के कर भरणा-या खातेदाराना आरओ चे पाणी देण्याचा व मोफत दळण देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे, असे जाधव म्हणाले.
पुढील काळात जमीनीची प्रत व पिकांचा दर्जा टिकवण्यासाठी सेंद्रीय खताचे वाटप करण्यात येणार आहे.गरम पाण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारे हीटर बसवण्यात येणार आहेत.पिण्याचे पाणी घरी नेण्यासाठी जार वाटप करण्यात येणार आहेत,असे त्यांनी स्पष्ट केले.