किराणा दुकानातून चक्क दारूची विक्री.
एकावर गुन्हा दाखल, ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
जळोची- किराणा दुकानातून चक्क दारू विक्री करणाऱ्यावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ५० हजार ६८ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तांदूळवाडी येथील निर्मळवस्ती येथे सतीश विष्णू लोंढे (रा. तांदुळवाडी) हा त्याच्या स्वामी समर्थ किराणा दुकानांमध्ये बेकायदा बिगर परवाना देशी विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर इसम हा देशी-विदेशी दारुचासाठा करून विक्री करत असताना आढळून आला. या कारवाईत ५० हजार ६८ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर इसमावर दारूबंदी कायदासह कोरोना विषाणू अंतर्गत अधिनियमान्वये बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप गोसावी, पो.हवा.सुरेश भोई, तानाजी गावडे,पो.ना. रमेश केकाण, आप्पा दराडे,वैभव साळवे, गणेश काटकर, राहुल लाळगे, शरद गावडे, पो.कॉ. श्रीकांत गोसावी, मपोना लता हिंगणे, जयश्री गवळी यांनी केली.