“… की आता मुंबई, महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही गदा आली?”
उत्तर प्रदेशातील घटनेवरून रोहित पवारांचा संतप्त सवाल
“… की आता मुंबई, महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही गदा आली?”
उत्तर प्रदेशातील घटनेवरून रोहित पवारांचा संतप्त सवाल
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरूवारी ताब्यात घेतलं होतं. उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. काँग्रेसकडून पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यात आला. तसंच एकंदरीत परिस्थितीतकडे पाहता या ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशातील एकूण घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी टीका केली. तसंच मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे या घटनेवर गप्प का? असा सवालही त्यांनी केला.
“उत्तर प्रदेशात माध्यमांना रोखून आणि पीडित कुटुंबाला डांबून उत्तर प्रदेश सरकार दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून करतंय. यापूर्वी मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे या घटनेवर काही बोलणार की नाही? आणखी किती दिवस गप्प बसणार? की त्यांच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आहे?,” असं सवाल रोहित पवार यांनी नाव न घेता कंगनालाही टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला.
कंगनाची चर्चा
काही दिवसांपूर्वीच कंगना रणौतने मुंबई आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असं वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर बराच वाद निर्माण झाला होता. खासकरुन कंगना आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात तर ट्विटर वॉरच रंगलं होतं. दरम्यान या सगळ्या वादानंतर मी ९ तारखेला मुंबईत येणार आहे कुणाची हिंमत असेल तर अडवा असे कंगनाने म्हटले होते. कंगना ज्या दिवशी मुंबईत आली म्हणजेच ९ सप्टेंबरला मुंबईत आली. त्यादिवशी तिचं मुंबईतील ऑफिस पाडण्यात आलं. यावरुनही तिने ठाकरे सरकारवर टीका केली होती. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या प्रकरणी कंगनाची भेट घेतली आणि तिला पाठिंबाही दर्शवला होता. आता एका निवृत्त अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या मुद्द्यावरुन कंगना रणौतने पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे असा आरोप कंगनाने केला होता.