मुंबई

कोरोनाविरुद्धच्या लढाईत चित्रपट उद्योगाने सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

सर्व प्रकारची मदत देण्याची चित्रपट उद्योगाची मुख्यमंत्र्यांना ग्वाही

कोरोनाविरुद्धच्या लढाईत चित्रपट उद्योगाने सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

सर्व प्रकारची मदत देण्याची चित्रपट उद्योगाची मुख्यमंत्र्यांना ग्वाही

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

लॉकडाऊनचा निर्णय घेऊन कुणाचीही रोजी-रोटी थांबवणे हा राज्य शासनाचा उद्देश नाही. परंतू राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही वाढ रोखण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावा लागल्यास त्याच्या अंमलबजावणीसाठी चित्रपट उद्योगाने राज्य शासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी कोरोनाला हरवण्यासाठी आम्ही प्रत्येक पावलावर राज्य शासनासोबत आहोत, अशी ग्वाही चित्रपट उद्योगाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना दिली.

मराठी आणि हिंदी चित्रपट निर्माता संघटना तसेच वाहिन्यांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंग, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, ज्येष्ठ निर्माता महेश भट, सुषमा शिरोमणी, मेघराज राजेभोसले, मनोज जोशी, सुबोध भावे, सिद्धार्थ रॉय कपूर, अमित बहेल, निखिल साने, दीपक राजाध्यक्ष, अजय भाळवणकर, टी पी अग्रवाल, सतीश राजवाडे, संग्राम शिर्के, अशोक दुबे, नितीन वैद्य, अशोक पंडित, अभिषेक रेगे, दीपक धर यांच्यासह विविध चित्रपट निर्माता संघटनांचे प्रतिनिधी आणि मराठी, हिंदी वाहिन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

या बैठकीत मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले की, कोरोनाविरुद्धच्या लढाईत शासन जास्तीत जास्त वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देत आहे. राज्यात वर्षभरापूर्वी केवळ 8 हजार एवढी असणारी रुग्णांसाठीच्या खाटांची संख्या आता सुविधा 3 लाख 60 हजारापर्यंत नेण्यात आली आहे. तसेच चाचण्यांची संख्या वाढवली असून मुंबईत दरदिवशी 50 ते 60 हजार तर राज्यात 1 लाख 80 हजार एवढ्या कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. लसीकरणात देखील शासन विक्रमी पद्धतीने आणि पूर्ण क्षमतेने काम करत आहे. मात्र वाढती रुग्णसंख्या पाहता येत्या काळात आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू शकतो. हे टाळण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लावावे लागणार आहेत. अशावेळी राज्य शासनास चित्रपट क्षेत्रातील सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असणार आहे, असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले. तसेच कोरोना रोखण्यासाठी शासनाने “मेरा मास्क मेरी जिम्मेदारी” यासारखी जनजागृती मोहिम राबवत आहे. कोरोना विषयक घ्यावयाच्या काळजीबाबत अशा मोहिमेतून जास्तीत जास्त जनजागृती होण्यासाठी मराठी आणि हिंदी वाहिन्यांनी मदत करावी, असे आवाहन ही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी केले.

आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले, वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य यंत्रणेवर जास्त ताण येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. यासाठी काही कठोर निर्णय घ्यावा लागल्यास सर्वांना विश्वासात घेऊन घेतला जाईल.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.देशमुख म्हणाले, कोरोनाचे वाढते संकट रोखण्यासाठी काही कठोर निर्णय झाल्यास चित्रपट उद्योगात त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन घेण्यात येईल. यावेळी मराठी व हिंदी चित्रपट संघटनांच्या प्रतिनिधींनी विविध सूचना केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!