कोरोना कक्षातील सुटके नंतर, कायदा मोडणारे जाणार तुरुंगात
धार्मिक कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्ह्यात आलेल्या 29 परदेशी नागरिकांसह सहा परराज्यातील नागरिकांवर अटकेची टांगती तलवार आहे.पर्यटन व्हिसा असताना या सर्वांनी धर्मप्रसार केला, तसेच जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.यातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, काही क्वारंटाईन आहेत. यांची रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर सर्वांच्या हाती बेड्या पडणार आहेत.तशी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत आहे. दिल्ली येथे तबलिगी जमातीच्या कार्यक्रमासाठी अनेक परदेशी व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रमानंतर त्यांनी संपूर्ण भारतात प्रवास केला.याच परदेशी नागरिकांमधील जिबुती, बेनिन, डिकोटा, आयव्हरी कोस्ट, घाना, इंडोनेशिया, ब्रुनई या देशातील 29 नागरिकांनी अहमदनगर शहरातील विविध धार्मिकस्थळी वास्तव्य केले.त्यातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली. यामुळे परदेशी नागरिकांसह त्यांना आश्रय देणार्याविरुद्ध भिंगार, नेवासा, जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.या सर्व परदेशी नागरिकांनी व्हिसाचा गैरवापर केल्याचे पोलीस तपासात सिद्ध झाले आहे. या सर्वांना पर्यटन व्हिसा दिलेला असताना यातील अटींचे उल्लंघन करून त्यांनी धर्मप्रसार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.या सर्वांना रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर अटक केली जाणार आहे.