स्थानिक

कोरोना समज-गैरसमज नक्की वाचा, समजून घ्या.

कोरोना बाबतची भिती व गैरसमज.

कोरोना समज-गैरसमज नक्की वाचा, समजून घ्या

कोरोना बाबतची भिती व गैरसमज.

बारामती:वार्तापत्र
कोरोना आजाराबाबत आपल्या मनामध्ये भीती बसली आहे व अनेक
गैरसमज ही आहेत. याकरिता पुढील बाबींचा शांतपणे विचार करा व अंमलात आणा कोरोनाचा फैलाव, कोरोना आजार झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात म्हणजे तुम्ही मास्क लावलेला नाही. रुग्णाने ही मास्क लावलेला नाही. रुग्ण खोकला किंवा शिंकला तर त्यापासून उडणान्या तुषारांच्या मधून होत आहे. त्यामुळे आपण मास्क वापरलाच पाहिजे व इतरांशी संपर्क ठेवताना अंतर ठेवलेच पाहिजे. बाहेरील वस्तू इत्यादींना हात लागल्यानंतर तो आपल्या चेहरा, तोंड, डोळे, नाक, कान यांना लागला जाणार नाही याची काळजी घ्यावी. व हात साबणाने स्वच्छ करीत जावे.

ताप आला कणकणी आली :

बऱ्याच वेळा आपणास कणकणी येते थोडासा
ताप, खोकला, सर्दी असेल तर आपण त्याला गांभीर्याने घेत नाही. घरगुती औषध घेऊन बरे वाटण्याची वाट पाहतो, किंवा कोरोनाच्या भीतीने तपासणी करून घेत नाही. परंतु तुम्हाला अनुभवाने नमूद करीतो कि आपणास थोडीशी जरी वरील लक्षणे दिसली तरी त्वरित डॉक्टरांना दाखवा. व आपली कोविडची तपासणी करा. तपासणी ही मेडिकल कॉलेजमधील स्वतंत्र निर्माण केलेल्या कक्षात विनामुल्य होत आहे. तिथे गेल्यावर आपण आपला स्वब देऊन त्याचा रिपोर्ट येईपर्यंत स्वतःला इतरांपासून बाजूला ठेवावे म्हणजे क्वारंटाईन करून घ्यावे. ही व्यवस्था मेडिकल कॉलेजमधील वसतिगृहात आहे अगर आपल्या घरी स्वतंत्र रुम, स्वतंत्र बाथरूम, शौचालयाची सोय असेल तर घरीच थांबावे. यामध्ये आपण घरातील इतरांच्याही संपर्कात येऊ नये एवढेच पथ्य पाळावे. थोडक्यात काय तर दुखणं
अंगावर काढू नका.

सर्वसाधारण दक्षता : आपणांस कामानिमीत्त व इतर कारणाने घराबाहेर जावे
लागत आहे. परत आल्यावर आंघोळ करावी. वृद्ध व लहान मुलांपासून दूर रहावे. तपासणी नंतर आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्वरित दवाखान्यात अॅडमिट व्हावे. यामध्ये सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल, रुई हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज वसतिगृह येथे व्यवस्था आहे यावेळी मदतीकरीता आपण डॉक्टरांना फोन करा.आपला रिपोर्ट निगेटिव्ह आला तर तिथून पुढे सात दिवस स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवा.

सिम्टेमॅटीक पेशंट : म्हणजे रुग्ण कोविड पॉझीटीव्ह आला आहे. ताप, सर्दी,
खोकला येतोय अशा रुग्णास रुग्णालयात ऍडमिट करावे लागते.

असिम्टेमॅटीक पेशंट : रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे परंतु त्यास एकही लक्षणे दिसत नाहीत. एकदाच ताप आला नंतर काही होत नाही अशा रुग्णास मेडिकल कॉलेज येथील निर्माण केलेल्या कोविड सेंटर मध्ये ठेवले जाते.

घरी उपचार : डॉक्टरांच्या सल्ल्याने असिम्टेमॅटीक रुग्णास स्वतःच्या घरी राहूनही उपचार घेता येतात, मात्र त्यांने तसे लेखी डॉक्टरांना व नगरपालीकेस कळविले पाहिजे. त्याच्या घरी स्वतंत्र खोली, स्वतंत्र स्वच्छतागृह इत्यादी सोयी पाहिजेत. व त्याचा घरातील कोणत्याही व्यक्तीशी जवळून संपर्क येता कामा नये. दिलेली औषधे वेळेवर घेऊन दिवसातून तीन वेळा टेम्परेचर व ऑक्सिजन चेक करून त्याची नोंद ठेवणे आवश्यक आहे. घरी असणाऱ्या रुग्णाने डिस्पोजेबल साहित्य उदाहरणार्थ कप, ग्लास,ताट वापरावे. जर घरातील भांडी वापरली जात असतील तर अशी भांडी उकळत्या गरम पाण्यात स्वच्छ करून घ्यावीत. ती इतरांनी हाताळताना हातामध्ये हॅण्डग्लोज घालून स्वच्छ करावेत व नंतर स्वतःचे हातही साबणाने स्वच्छ धुवावेत रुग्णा जवळ जाताना किमान दहा फूट अंतर राहील याची काळजी घ्यावी. अशा वेळी स्वत: व रुग्ण यांनी मास्क घातलेले असावे.रुग्णाला पौष्टीक व सकस आहार द्यावा, मांसाहारी रुग्णांनी उकडलेली अंडी खावीत. तेलकट,आंबट , तिखट खाऊ नये. लिंबूवर्गीय (व्हिटामीन-सी युक्त) फळे संत्री, मोसंबी, आवळा रस, ज्युस घ्यावेत. दिवसातून किमान दोन वेळा गरम पाण्याची वाफ घ्यावी. गरम पाणीच प्यावे, फळे खावीत, भरपूर झोप घ्यावी. झोपताना हळद घातलेले दूध प्यावे. व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनातून भीती काढून टाकावी व मी आजारातून बराच होणार आहे हा निर्धार करावा.

सात दिवसात बरे होतो : रुग्णावर उपचार सुरू केल्यानंतर तो फक्त सात दिवसात बरा झालेला दिसतो. मात्र एकूण चौदा दिवस विलगीकरण करणे व २१ दिवसापर्यंत इतरांमध्ये भागी होण्याचे टाळावे.

कुणाला जास्त त्रास होतो : ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे, ज्या व्यक्तींना पूर्वीचे ब्लड प्रेशर, शुगर, अस्थमा, किडनी पोटाचे विकार, श्वसनाचे आजार आहेत अशा रुग्णांना त्रास जास्त होतो, तसेच लहान मुले, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक व गर्भवती महिला यांना त्रास होण्याचा संभव असतो म्हणून अशा रुग्णांनी स्वतःला काही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. यामध्ये वेळ घालवू नये.

बारामती मधील रुग्णालय : मा.ना. अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून रुग्णांना उपचार होणे कामी सिल्वर ज्युबिली हॉस्पिटल बारामती येथे १०० बेडला ऑक्सिजनची व्यवस्था आहे. रुई ग्रामीण रुग्णालयात ३० बेड ऑक्सिजन व्यवस्था यामध्ये व्हेंटीलेटर ची व्यवस्था आहे. तर बारामती हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटल म्हणून उपचारार्थ आहे. तसेच शहरातील इतर खाजगी हॉस्पिटल मध्ये ही उपचार केले जात आहेत. माननीय अजितदादा पवार हे दर आठवड्याला बारामती येथे येऊन आजार व त्याचा फैलाव कमी होणेबाबत आढावा घेत आहेत आणि पुढील उपचार व उपाययोजनाचे आदेश देत आहेत.

औषधे व इंजेक्शने : या आजाराकरिता लागणारी औषधे-गोळ्या इंजेक्शन्स
बारामतीमध्ये उपलब्ध आहेत. ती सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल, रुई हॉस्पिटल
मधील रुग्णांना मोफत वापरली जातात.

   कोविड रुग्णाकडे व त्यांच्या कुटुंबाकडे आपलेपणाने पहा.
एखाद्या व्यक्तीला कोविड झाला की त्याच्याकडे व कुटुंबाकडे पाहण्याचा नागरीकांचा दृष्टिकोन बदलताना दिसत आहे. त्या कुटुंब, घरापासून फटकून वागताना दिसत आहे. ते पूर्णतः असामाजिक आहे. आपण समाज प्रिय, समाज हितार्थ असे आहोत असे असताना नेमके काय झाले की आपण असे वागायला लागलो आहोत. ? त्यामागे चुकीची माहिती, भ्रामक कल्पना,
भिती व अज्ञान आहे ते दूर करा. आपलेपणाने वागा नाहीतर काही काळापर्यंत गुण्यागोविंदाने राहणारे आपण सख्खे शेजारी राहणार नाहीत. वेळ कोणावरही येऊ शकते या वेळी गरज आहे ती एकमेकांना आधार देण्याची. आपुलकी आपलेपणाची, यावरच आपली समाज व्यवस्था टिकून राहणार आहे.

विदारक सत्य : समाज एवढा घाबरला आहे की सख्या नातेवाईकाचा कोरोनाने मृत्यू झालेनंतर अंत्यविधीलाही न येण्याची उदाहरणे समोर येत आहेत. वास्तविक कोरोना रुग्णाचा अंत्यविधी बारामती नगर परिषदेचे कर्मचारी विधिवत करीत आहेत. प्रत्येक अंत्यविधी नंतर त्या कर्मचाऱ्यांना सात दिवसाकरीता विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. यामधील कोणत्याही
कर्मचाऱ्याला कोरोना ची बाधा झालेली नाही, यावरून एवढा तरी बोध घेण्याची गरज आहे. की गैरसमज व भिती अपुरी माहिती यामुळे आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण असणाऱ्या अंत्यविधीसही उपस्थित राहत नाही, एवढे का आपण निर्दयी झालेलो आहोत ? तर नाही याबाबतच्या शासकीय नियमाप्रमाणे सुरक्षित अंतर राखून उपस्थित राहता येते हा ही विचार करणे गरजेचे आहे.

                           ॲम्बुलन्स व इतर माहितीसाठी संपर्क 
सिल्व्हर ज्युबिली हॉस्पीटल संपर्क                रुई ग्रामीण रुग्णालय संपर्क

डॉ.सदानंद काळे मो.९६८९१५४५२२            डॉ.सुनिल दराडे मो.९८९०५१०४२६.

डॉ.हेमंत नाझीरकर मो.९८२२३७८९९८    कोविड केअर सेंटर (मेडीकल कॉलेज)
                                                      डॉ.मनोज खोमणे मो.९८२२०२०५९५

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!