कोविडपासून बचावासाठी पाणी आणि साबण
कोरोनासारखा श्वसनसंस्थेशी संबंधित विषाणू आपले डोळे, नाक आणि घशाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो.

कोविडपासून बचावासाठी पाणी आणि साबण
कोरोनासारखा श्वसनसंस्थेशी संबंधित विषाणू आपले डोळे, नाक आणि घशाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो.
बारामती वार्तापत्र
पाण्याचे मानवी जीवनासाठी असलेले महत्त्व सर्वस्तरावर पोहोचविण्यासाठी १९९३ पासून दरवर्षी २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाच्या निमित्ताने पाण्याशी संबंधित एका संकल्पनेवर चर्चा घडवून आणली जाते. यावर्षी ‘लोकांच्यादृष्टीने पाण्याचे महत्त्व’ अशी संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. घर, संस्कृती, अर्थकारण, शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा विविध घटकांसाठी पाण्याचे महत्त्व वेगळे आहे. कोरोना काळात हात स्वच्छ ठेवण्यासाठी पाणी हा घटक महत्त्वाचा ठरत आहे.
साधारण १७० वर्षापूर्वी विषाणूचा संसर्ग प्रदूषित हवेमुळे किंवा चुकीच्या कृत्यामुळे होतो असा समज होता. मात्र १९ व्या शतकात डॉक्टर इग्नास सेमेल्विस यांनी सूक्ष्मजंतूपासून होणाऱ्या संसर्गाचा शोध लावला आणि साबणाने हात धुतल्याने विषाणूमुळे होणाऱ्या घातक आजारापासून संरक्षण मिळविता येते हे सिद्ध केले. २० व्या शतकात एलेनी लार्सन या संशोधिकेने यात आणखी भर घातली आणि हात धुण्याचे महत्त्व देखील विशद केले. कोरोना संकटाच्या काळात हात धुण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
कोरोनासारखा श्वसनसंस्थेशी संबंधित विषाणू आपले डोळे, नाक आणि घशाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो. बऱ्याचदा हा विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्यापर्यंत हाताद्वारे पोहोचत असतो. त्यामुळे या संकटाच्या काळात विषाणूला रोखण्यासाठी पाणी आणि साबणाने आपले हात स्वच्छ धुणे हा सर्वात सोपा आणि सहज उपाय आहे.
हात घाईने धुतल्यास हातावरील विषाणू नष्ट होत नाही. त्यामुळे हात धुण्याची योग्य पद्धत जाणून घेणे गरजेचे आहे.
- आपले हात पूर्णपणे ओले करा.
- ओल्या हाताचा संपूर्ण पृष्ठभाग आच्छादेल या पद्धतीने पुरेसा साबण लावा.
- हाताच संपूर्ण पृष्ठभाग, बोटामधील भाग निटपणे चोळा. ही प्रक्रिया किमान 20 सेकंद सुरू ठेवा.
- नळाच्या पाण्याने हात निटपणे धूवा.
- स्वच्छ टॉवेलने हात कोरडे करा.
- सॅनिटायझराचा वापर करूनही अशाच पद्धतीने हात स्वच्छ करू शकतात.
हात केव्हा धुवावेत हे लक्षात घेणेही आवश्यक आहे. अस्वच्छ हात नकळतपणे नाक किंवा तोंडाकडे नेल्यास विषाणूचा संसर्ग होण्याची भीती असते. त्यामुळे शौचालयात जावून आल्यावर, खाण्याआधी व नंतर, कचरा हाताळल्यानंतर, पाळीव प्राण्यांना हात लावल्यानंतर, लहान मुलांसाठी वापरले जाणारे डायपर हाताळल्यानंतर किंवा हात अस्वच्छ दिसत असल्यास ते तात्काळ धुणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर कोणत्याही परिस्थितीत चेहऱ्याकडे हात नेण्यापूर्वी ते धुणे किंवा सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे. लहान मुलांना हात धुण्याच्या सोप्या पद्धती दाखवून त्यांनादेखील हात धुण्याची सवय लावणे महत्त्वाचे आहे.
ओल्या पृ्ष्ठभागावर विषाणू लवकरच पसरतात. त्यामुळे टॉवेलने हात कोरडे करणे आवश्यक आहे. कोरड्या पृष्ठभागावरून विषाणू इतर ठिकाणी पसरण्याची शक्यता कमी असते. साबणाने हात धुतल्याने कोरोना विषाणूवरील संरक्षक आवरण नष्ट होत असल्याने त्याचा संसर्ग रोखता येतो. हात अस्वच्छ दिसत असल्यास सॅनिटायझरपेक्षा साबणाचा उपयोग करणे अधिक योग्य ठरते.
हात धुण्याने आपण स्वत:चे संरक्षण करू शकतात, मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी इतरही बाबी महत्त्वाच्या आहेत. शारीरिक अंतराचे पालन करण्यासोबत एकमेकांचे टॉवेल, भांडी, कप किंवा खाद्यपदार्थ न वापरणे तसेच हस्तांदोलनासारख्या बाबी टाळणे तेवढेचे महत्वाचे आहे. मास्कचा वापर करा आणि चेहऱ्याला हाताचा स्पर्श होऊ देऊ नका. विषाणूच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागाच्या स्वच्छतेवर भर द्या.
लक्षात ठेवा हाताची स्वच्छता आपल्या जीवनाचे रक्षण करणारी असते. त्यामुळे कोविडसारख्या संकटाचा सामना करण्यासाठी हात स्वच्छ करण्याची सवय करावी लागेल. 40 टक्के जनतेला पाणी आणि साबणाची उपलब्धता नसल्याने अशी सुविधा मिळत नाही. सुदैवाने आपल्याकडे असलेल्या सुविधेचा उपयोग करून बालकांना आणि महिलांना इतर आजारापासूनही वाचविता येते, कोविडपासूनही संरक्षण करता येते. म्हणून जागतिक जलदिनाच्या निमित्ताने पाण्याचा उपयोग हात स्वछ ठेवण्यासाठी करू या, आणि हो, त्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया, अडवूया आणि जिरवूया….!