कोविड केअर सेंटर मधील गोळ्या होतात गायब….
धक्कादायक प्रकार ऑडिओ क्लिप मधून झाला उघड.
बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णांना तातडीने व योग्य उपचार मिळावेत म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी येथे कोवीड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे उद्घाटन ही झाले. मात्र याच कोवीड केअर सेंटर मध्ये काही काम करणारे महाभाग येथील कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या महागड्या औषधांवर डल्ला मारत असल्याची बाब आठ दिवसानंतर उघडकीस आली आहे. त्यामुळे तळे राखी तोच पाणी चाखी याचा अनुभव इंदापूरकरांना येत आहे.
याबाबत सविस्तर माहीती अशी की निमगांव केतकी ग्रामिण रूग्णालयातील कोवीड केअर सेंटर मध्ये कोवीड बाधीत रुग्णांवर उपचार केले जातात. या उपचारात Fabiflu या गोळीचा वापर केला जातो. दि.09 सप्टेंबर रोजी निमगांव केतकी ग्रामिण रूग्णालयातील औषध भांडार विभागाने कोवीड केअर कक्षातील अंतररुग्णांकरीता फॅबी फ्ल्यू (Fabiflu) या 510 गोळ्या(15 स्ट्रीप) चा साठा वापरासाठी उपलब्ध करुन दिला. या एका स्ट्रीप मध्ये 34 गोळ्या असतात. याची सरासरी किंमत 2200 ते 3400 दरम्यान असते. त्या दिवशी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या एका स्ट्रीप ची किंमत 2210 रुपये होती. साधारण सकाळी 09 वाजता औषध भांडार विभागागे हा 510 गोळ्यांचा साठा वारण्यासाठी उपलब्ध करुन दिला. तशी रजिस्टर ला नोंद देखील आहे.
त्याच दिवशी सदरील रूग्णालयात सेवा बजावणारे एक डाॅक्टर या गोळीच्या दोन स्ट्रीप मला हव्या आहेत अशी मागणी तेथील पुरवठा विभागाकडे करत होते. त्यानंतर आपण वरिष्ठांची परवानगी घ्या व अंतररुग्ण विभागाकडे गोळ्या उपलब्ध आहेत. आपण तेथून आपणांस हव्या असणाऱ्या गोळ्या नेऊ शकता अशी चर्चा झाल्याचे समजते.सायंकाळी सहा चे दरम्यान कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिका यांनी पुरवठा विभागाकडे फॅबी फ्ल्यू (Fabiflu) संपल्या आहेत. एका रुग्णास त्या देणे गरजेचे आहे तर द्याव्यात अशी मागणी केली. या नंतर आज सकाळीच 510 गोळ्या अंतररुग्ण विभागास वापरण्यास उपलब्ध करुन दिल्या आहेत.आपण स्टोअर रुम ला चेक करा असे सांगण्यात आले. गोळ्या कुठे आहेत ? इथे तर काहीच शिल्लक नाहीत असा सूर बाहेर पडला आणि शोधाशोध सुरु झाली. सबंधितांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता असे दिसून आले कि तीन बाँक्स् पैकी दोन बाँक्स गायब आहेत. व एका बाँक्स मध्ये पाच स्ट्रीप असतात त्याऐवजी दोनच स्ट्रीप आहेत. एकूणच दोन पँक बाँक्स म्हणजे 34 गोळ्यांची 10 पाकिटे लंपास झाल्याचे स्पष्ट झाले.
बराच वेळ शोधाशोध झाल्यानंतर एकाच्या लक्षात आले कि दुपारी एक डाँक्टर आपल्याला फॅबी फ्ल्यू (Fabiflu) गोळ्यांच्या दोन स्ट्रीप मागत होते आणि मगं शंका आली. सदरील डाँक्टरकडे कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिकेने फोनवरुन चर्चा केली असता त्यांनी मी दोन बाँक्स म्हणजेच 10 पाकिटे आणले असून सर्वच्या सर्व एका कुटुंबाला दिली आहेत असे उत्तर दिले. त्यावर परिचारिकेने विचारले कि आपल्याकडे सदर रुग्ण अँडमिट आहेत का? त्यांची नोंद आहे का? त्यावर सबंधीत डाॅक्टर बोलले आपल्याकडे अँडमिट नाहीत पण मी सरांना सांगितले आहे तुम्ही नोंद करा. त्यावर परिचारिका म्हणाली मी डाॅ. मिलींद खाडे यांना विचारले आहे ते म्हणाले मि केवळ दोन स्ट्रीप घ्या असे सांगितले होते. आता हे प्रकरण वाढत चालले असून आम्हाला सर्व गोष्टींचे रेकाँर्ड ठेवावे लागत आहे. त्यावर संबंधित डाँक्टर म्हणाले कि आपल्याला नांवे देतो ती त्यांच्या नांवे नोंद करा. त्यावर परिचारीका म्हणाली आता इथे उपचार घेणा-या रुग्णांना आम्ही काय द्यायचे? औषध भांडार म्हणत आहे कि सकाळीच 510 गोळ्या दिल्या आहेत त्या संपल्याशिवाय आपणांस अधिकचा साठा दिला जाणार नाही. आपण केवळ अंतररुग्णांनाचं अौषध पुरवठा करु शकतो. यावर संबंधीत डाँक्टरने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावर सदरिल परिचारिकेने आमच्या कायमस्वरूपी च्या कर्मचाऱ्यांच्या परवानगी शिवाय यापुढे आपण एकही गोष्ट न्यायची नाही अशी कडक ताकीदही दिली. अर्थात या परिचारिकेला या सर्व प्रकरणाचा तेवढा त्रास ही झाला होता. आपण मला गोळ्याची पाकीटे परत द्या अथवा लेखी द्या अशी मागणी तीने डाॅक्टरकडे केली. हा काय एक दोन हजाराचा घोळ नाही 36 हजाराचा आहे…! त्यावर सबंधित डाँक्टर म्हणाले कि गोळ्या मिळत नव्हत्या म्हणूनचं मी असं केले.मी इंदापूर ग्रामीण रुग्णालयाकडून तुम्हाला तेवढ्या गोळ्या द्यायला सांगतो असे उत्तर दिले.या सर्व प्रकारानंतर खुप वेळा समजावल्यानंतर गोळ्यांचा साठा गायब करणाऱ्या डाॅक्टरने 10 पैकी 8 पाकिटे परहस्ते निमगांव केतकी कोवीड केअर सेंटर ला पोहच केल्याचेही खात्रीलायक सुत्रांनी सांगितले. त्यानंतर रूग्णालयातील स्टाफ ने सुटकेचा सुस्कारा सोडला. मात्र 4420 रुपये किमतीच्या 68 गोळ्यांचे काय हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.यासर्व प्रकरणानंतर निमगांव केतकी रूग्णालयाने या प्रकरणावर पडदा टाकून काहीही घडले नाही असे दाखवले.मात्र एका व्हायरल अँडिओ मधून हा प्रकार समोर अाल्याने सर्व भिंग फुटले.
प्रत्यक्षात सदरील डाॅक्टर ला दोन पाकिटे म्हणजे 68 गोळ्या हव्या होत्या आणि तेवढ्याच गोळ्या तुम्ही घ्या असे वरिष्ठांनी सांगितले होते. मात्र असे असताना ज्यादाची 8 पाकिटे म्हणजे 272 गोळ्या सदरिल डाॅक्टरने कोणत्या उद्देशाने नेल्या? आणि कोणासही न सांगता का नेल्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचसोबत कोवीड केअर सेंटर मध्ये उपचार घेणा-या रुग्णांना सेवा देण्याऐवजी जबाबदार अधिकारी असे वागत असतील तर जनसामन्यांच्या आरोग्याचे काय ? असा प्रश्न ही उपस्थित झाला आहे.
वास्तविक पाहता निमगांव केतकी कोवीड केअर सेंर मध्ये वारण्यात येणारी औषधे ही त्याच ठिकाणी उपचार घेणा-या रुग्णांसाठी वापरणे अपेक्षित आहे.शिवाय एखादे औषध अतितात्काळ कोणास द्यावयाचे झाले तर सदर रुग्णालयाचे अधिक्षक यांच्या लेखी परवानगीने ती देऊन ती कोणास व का दिली याची दप्तरी नोंद त्याच वेळी करणे बंधकारक आहे.मात्र इथे या 68 गोळ्या देताना अशी लेखी परवानगी घेतली गेली नाही.केवळ फोनवरुन चर्चा झाली व तशी गोळ्यांची नोंद देखील केली गेली नाही.शिवाय 2 ऐवजी 10 पाकिटे नेण्यामागील उद्देश काय? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे निमगांव केतकीच्या कोवीड सेंटरचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
या प्रकरणी निमगांव केतकी कोवीड सेंटरचे प्रमुख डाॅ.मिलिंद खाडे यांच्याशी भ्रमणध्वनी वरुन विचारणा केली असता ते म्हणाले सदरील डाँक्टरने त्यांच्या रुग्णांसाठी गोळ्या नेल्या होत्या.मात्र त्यांनी त्या सर्व परत जमा केल्या आहेत. असे सांगून त्यांनी अधिकचे बोलने टाळले. मात्र डाँक्टरने नेलेल्या 10 पाकिटांपैकी 8 पाकिटे जमा झाल्याचे परिचारिका आणि डाॅक्टर यांच्यात संभाषण झालेल्या आँडिओ क्लीप मध्ये स्पष्ट होत असल्याने कोवीड केअर सेंटरचे अधिक्षकचं अशा विकृतींना पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट होते.