कोव्हिड 19 वरील लसींचे दोन डोस घेतलेल्यांना ‘आरटीपीसीआर’मधून सूट
असे आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केलेत.

कोव्हिड 19 वरील लसींचे दोन डोस घेतलेल्यांना ‘आरटीपीसीआर’मधून सूट
असे आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केलेत.
मुंबई : बारामती वार्तापत्र
कोव्हिड 19 वरील ज्यांनी दोन्ही लसी घेतल्या असतील आणि लसी घेतल्यानंतर 15 दिवसांचा अवधी उलटला असेल, त्यांना राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करण्याची गरज राहणार नाही. मात्र अशा व्यक्तींकडे केंद्र सरकारच्या ‘कोविन’ या पोर्टलवरून प्राप्त केलेले अधिकृत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे, असे आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केलेत.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाही ही सूट लागू असणार
आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या अंतर्गत दिलेल्या अधिकारांनुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य सचिवांनी हा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाही ही सूट लागू असेल, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोव्हिड रोखण्यासाठी उचित नियमांचे पालन करणे बंधनकारक
ही सूट लागू असली तरीही लसीकरण झालेल्या अथवा न झालेल्या सर्व प्रवाशांना कोव्हिड रोखण्यासाठी उचित नियमांचे (चेहऱ्यावर मास्क परिधान करणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, शारीरिक अंतर राखणे इ.) पालन करणे बंधनकारक राहणार आहे. इतर सर्व नागरीकांसाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणीच्या वैधतेचा काळ 48 तासांवरून वाढवून 72 तास इतका करण्यात आल्याचे एका पत्रका मार्फत प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या
ज्यांनी कोरोना लसीचे दोन लस घेतले आहेत. त्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली होती. दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्र लिहून ही मागणी केली होती. त्यामुळे कोव्हिडची लस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबईचा पॉझिटीव्हिटी दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी तातडीने लोकल सुरू करावी. कल्याण-डोंबिवलीहून खाजगी वाहनाने मुंबईत येण्यासाठी नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागतात, त्यामुळे चाकरमान्यांचे हित लक्षात घेत कोव्हिडच्या लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या चाकरमान्यांना लोकल प्रवासाची अनुमती देण्यात यावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली होती.