
गळ्याला सुरा लावून बारामतीत भरदिवसा आठ लाखांची चोरी!
जागे करून पैसे कुठे ठेवले आहेत
बारामती वार्तापत्र
बारामतीतील कसबा येथे अज्ञात दोन चोरट्यांनी गॅरेजच्या मागील राहत्या घरात घुसून साडेसहा लाख रुपयांची रोकड व दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असा आठ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी कसबा येथील प्रमिला भाऊसाहेब भालेराव यांनी बारामती शहर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील फलटण रोडवरील भालेराव गॅरेजच्या मागे प्रमिला भालेराव व भालेराव कुटुंब राहते.
या राहत्या घरातून दुपारी तीन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान दोन चोरट्यांनी उघड्या घरामध्ये प्रवेश करून घरामध्ये दुपारच्या वेळी झोपलेल्या प्रमिला भालेराव यांना जागे करून पैसे कुठे ठेवले आहेत अशी विचारणा केली. त्यावरून प्रमिला भालेराव यांनी कसले पैसे असा मोठा आवाज केला. तेव्हा घरामध्ये झोपलेल्या त्यांच्या सून जागे झाल्या आणि त्या बाहेर आल्या असता त्यापैकी एकाने सुरा काढून सुनेच्या गळ्याला लावून घरातील दागिने आणि पैसे देत नाही तर सुनेला खलास करू असा दम दिला.
त्यावरून प्रमिला भालेराव यांनी आठ लाख रुपयांची रक्कम स्वाधीन केली. त्यानंतर चोरट्यांनी सुनेला ढकलून दिले व घरातून निघून फलटण बाजूकडे पळ काढला. या घटनेचा पुढील तपास बारामती पोलीस करीत आहेत. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पालवे हे तपास करत आहेत.