स्पीड बोटीच्या मदतीने उजनी जलाशयात महसूल व पोलिसांची सर्च मोहीम : वाळू माफियांची धावाधाव
स्पीड बोटीच्या मदतीने कारवाईला गती

स्पीड बोटीच्या मदतीने उजनी जलाशयात महसूल व पोलिसांची सर्च मोहीम : वाळू माफियांची धावाधाव
स्पीड बोटीच्या मदतीने कारवाईला गती
इंदापूर : प्रतिनिधी
गेल्या आठवड्यापासून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल विभाग व इंदापूर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाईचा बडगा उगारला आहे. शुक्रवारी (दि.६) पोलीस दलात दाखल झालेल्या स्पीड बोटीच्या मदतीने दुसऱ्याच दिवशी कारवाईला गती प्राप्त झाली आहे.शनिवारी (दि.७) सकाळी ११ वा. पासून ५ वाजेपर्यंत चाललेल्या सर्च मोहिमेत उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील कांदलगाव परिसरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या सुमारे ४० लाख रुपये किंमतीच्या ४ यांत्रिकी बोटी व सेक्शन पंप उध्वस्त केले आहेत.
सरकारचा महसूल बुडवून अवैद्य वाळू उपसा व वाहतुक करणाऱ्यांवर निर्बंध घालण्यासाठी महसूल विभाग आणि इंदापूर पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध वाळू तस्करी समूळ नष्ट करण्यासाठी संपूर्ण उजनी जलाशयातच सर्च मोहीम राबवली आहे.वाळूवर डल्ला मारत निर्ढावलेल्या वाळूमाफियांकडून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात होता.मात्र महसूल विभाग व पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारून वाळू तस्करांची दैना उडवल्याचे एकूण चित्र आहे.राजकीय पक्ष, संघटनांच्या दबावाला न जुमानता वाळूमाफियांवर पोलीस आणि महसूल विभागाने केलेल्या कारवाईचे जनतेतून स्वागत केले जात आहे.
सदरील कारवाईच्या सर्च मोहिमेत तहसीलदार अनिल ठोंबरे, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे,पोलीस नाईक गणेश झरेकर, पोलीस कर्मचारी अमोल गारुडी, समाधान केसकर,लिंगदेव नवले,सूरज कदम,शर्मा पवार तसेच पोलीस पाटील राजेंद्र शिंदे तसेच महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.