गांजा वाहतूक करणाऱ्याला भिगवण पोलिसांनी केली अटक
सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
इंदापूर : प्रतिनिधी
मोटारसायकलवरून पोत्यातून गांजाची वाहतूक करणाऱ्या एकाला भिगवण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३५.८ किलो गांजा,एक होंडा शाईन मोटार सायकल असा एकूण ६ लाख १६ हजार दोनशे ऐंशी रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर हकीकत अशी की,मौजे डिकसळ गावच्या हद्दीत राशीन ते भिगवण रोडवर नाकाबंदी करीत असताना गुरुवारी (दि.१८) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक इसम हा मोटार सायकल वरून अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास डिकसळ या ठिकाणी नाकाबंदी व सापळा रचून सुनील अनिल जाधव ( वय २४ वर्ष, रा.सासवड,उदाचीवाडी, ता.पुरंदर,जि. पुणे ) यास पकडून पोत्याची झडती घेतली असता गांजा आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क),२० (ब),(क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदरील कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी दिलीप पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक दडस-पाटील,पो.उपनिरीक्षक सुभाष रुपनवर, पोलीस अंमलदार दत्तू जाधव,रामदास जाधव,सचिन पवार,महेश उगले,अंकुश माने,हसीम मुलाणी,महेश बोरुडे,कल्पना वाबळे,होमगार्ड नितीन धुमाळ व पोलीस मित्र यांनी केली आहे.