
गाळा भाडे कपात करा अन्यथा उपोषणास बसणार
बारामती नगरपरिषद गाळेधारक असोसिएशनचा इशारा
बारामती वार्तापत्र
राज्यात आणी देशात कोरोना महामारीचे संकट असताना लॉकडाउनच्या कालावधीत बारामती शहर व तालुका सहा ते सात महिने बंद असल्यामुळे सर्व गाळेधारक व्यावसायिकांची दुकानेही बंद होती त्यामुळे व्यावसायिकांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले होते.
केंद्र व राज्य सरकारच्या ठरलेल्या धोरणाप्रमाणे व्यावसायिकांचे गाळा भाडे माफ करावे असा आदेश असताना बारामती नगर परिषदेच्या वतीने सर्व गाळेधारकांना बंद कालावधीतील गाळाभाडे आकारणी व शास्ती सह दंडव्याज भरावे यासाठी नगरपरिषदेच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्याविरोधात बारामती नगरपालिका गाळेधारक असोसिएशनच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार नगरपालिकेने गाळा भाड्यात कपात करावी व दंड व्याज माफ करावे या मागणीचे निवेदन नगराध्यक्षा सौ पौर्णिमाताई तावरे यांना देण्यात आले आहे. सदरची मागणी मान्य न झाल्यास गाळेधारक असोसिएशनच्या वतीने उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे
लॉकडाउनच्या कालावधीत व्यवसायिकांना अनेक बिकट आर्थिक प्रसंगांना सामोरे जावे लागले होते कोणत्याही प्रकारचा आर्थिक स्त्रोत या सहा ते सात महिन्याच्या कालावधीत नसल्याने अगोदरच आर्थिक अडचण झालेली असताना आता यामध्ये नगरपालिकेने गाळाभाड्या सह शास्ती व दंड व्याज आकारणीच्या नोटिसा बजावल्यामुळे व्यवसायिक हवालदिल झाले आहेत.