कोरोंना विशेष
गुजरातेत अडकलेल्या वीस युवती सुखरूप महाराष्ट्रात पोहोचल्या
कुटुंबियांकडून खा. सुळे यांचे आभार...
गुजरातेत अडकलेल्या वीस युवती सुखरूप महाराष्ट्रात पोहोचल्या
- लॉकडाऊनच्या काळात गुजरातमध्ये अडकलेल्या भंडारा जिल्ह्यातील वीस मुली खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रयत्नांमुळे आपापल्या घरी सुखरूप पोहोचल्या. परमुलुखात अडकून पडलेल्या या मुली घरी पोहोचताच त्यांच्या मायपित्यांनी आणि अन्य कुटुंबीयांनी सुप्रिया सुळे यांचे भरभरून आभार मानले आहेत.
- कौशल्य विकास कार्यक्रमासाठी गुजरातेतील वापी आणि सुरत येथे भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर आणि साकोली तालुक्यांतील या २० मुली गेल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर लॉकडाऊनमुळे या सर्वजणी तिकडेच अडकून पडल्या. स्थानिक पातळीवर या मुली आणि त्यांच्या पालकांनी प्रयत्न।केले; मात्र उपयोग होत नसल्याने अखेरणत्यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधून आपली अडचण सांगितली.
ही बाब लक्षात येताच सुळे यांनी तातडीने सुत्रे फिरवून या मुलींना परत महाराष्ट्रात आणण्याची मोहिम हाती घेतली. एका बाजूला दोन्ही राज्यांच्या प्रशासनांसोबत पाठपुरावा आणि त्याचवेळी दुसरीकडे या मुलींना मानसिक आधार देणेही आवश्यक होते. त्यासाठी सुळे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्याच्या अध्यक्ष सक्षणा सलगर यांना या मुलींच्या सतत संपर्कात राहण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार सलगर या सातत्याने या मुलींच्या संपर्कात होत्या, तर स्वतः सुप्रिया सुळे यांनी गुजरात सरकार व प्रशासनासोबत योग्य तो समन्वय साधून या मुलींना परत आणण्यात यश मिळविले.
या मुलींना आपल्या घरी पोहोचविण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दिपक सिंगला तसेच भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी एम. जी. प्रदीप चंद्रन यांचेही मोठे सहकार्य झाले. शिक्षणासाठी म्हणून जाऊन परक्या मुलूखात अडकलेल्या आपल्या लेकी घरी येताच त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले असून ते सर्वजण सुप्रिया सुळे यांचे भरभरून आभार मानत आहेत.