चंदन तस्कर पोलिसांच्या ताब्यात.
चंदन घेऊन जात असता पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
इंदापूर:- सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असणाऱ्या निमगांव पोलीस दुरक्षेत्रातील पोलिसांनी मोठ्या शिताफिने सापळा रचून चंदन तस्करांना बेड्या ठोकत त्यांना गजाआड केले आहे. यात एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह सहा चंदन तस्करांवर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४२,५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय इंदापूर यांचे न्यायालयात १० जुलै रोजी हजर केले असता न्यायालयाने दि.१४ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नाना माणिक पवार वय ५० वर्षे (राहणार वरकुटे खुर्द,ता. इंदापुर जि.पुणे), एका सोळा वर्षाच्या (विधीसंघर्षग्रस्त बालकाचा) समावेश आहे, हणुमंत विठ्ठल पवार वय ५० वर्षे भास्कर विठ्ठल पवार, वय ४० वर्ष ( दोघे राहणार वरकुटे खुर्द,ता. इंदापूर जि.पुणे), मनु (पूर्ण नाव माहीत नाही) राहणार व्याहळी.ता. इंदापूर, बिना दाडे,(राहणार रोपळे, ता.मोहोळ जिल्हा सोलापूर) अशी आरोपींची नावे असून यापैकी केवळ नाना माणिक पवार या मुख्य आरोपीस पोलीसांनी अटक केली.(विधीसंघर्षग्रस्त बालकास) त्याची आईकडे ताब्यात देण्यात आले असून तसा जबाब घेण्यात आला आहे.
शिवाय आवश्यकता भासेल तेव्हा पोलीस स्टेशनला हजर करण्याची समज देण्यात आली आहे.
याबाबत पोलीस काँस्टेबल विशाल चौधर यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे कि, ०९ जुलै २०२० रोजी निमगांव केतकी दूरक्षेत्रात कामावर उपस्थित असणाऱ्या गुन्हे शोध पथकाचे अंमलदार एस.एस.वाघमारे,पोलीस काँस्टेबल विशाल चौधर व जाधव कर्तव्यावर हजर होतो. यांना एका खब-या मार्फत व्याहळी गावचे हद्दीत वनविभागाच्या क्षेत्रात चंदनाची लाकडांची चोरी होणार असल्याची गुप्त माहीती मिळाली.
पोलीस निरिक्षक नारायण सारंगकर यांच्या सुचनेनुसार छापा घातला असता दोन इसम मोटर सायकल वरून चंदनाचा माल निमगांवच्या दिशेने घेऊन गेले असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली.बारामती – इंदापूर मार्गावर निमगांव नजिक दोन इसम आपल्या मोटर सायकल वरून संशयास्पदरीत्या काहीतरी घेऊन जात असल्याचे दिसले ३ किलो चंदनाची लाकडे अंदाजे किंमत १२००० रुपये व २५००० रुपये अंदाजे किमतीची यमाहा कंपनी एम.एच.४२ यू ९७९१ असा ३७००० रुपये किमतीचा वर्णनाचा माल ताब्यात घेतला . सहाय्यक पोलीस निरिक्षक बिराप्पा लातुरे यांनी त्याचा पंचनामा केला.
यातील मुख्य आरोपी नाना माणिक पवार वय ५० वर्षे (राहणार वरकुटे खुर्द,ता. इंदापूर जि.पुणे) याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय इंदापूर यांचे न्यायालयात दि.१० जुलै रोजी हजर केले असता न्यायालयाने दि.१४ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक बी.एन.लातुरे करीत आहेत.