चर्चा बारामतीची !
संपादकीय
बारामती वार्तापत्र
देशात आणि राज्यात बारामतीची चर्चा होणे हे तर काही नवीन नाही पवारांचे बारामतीतील काम आणि त्यातही अजित दादांचे स्पष्टवक्ते आणि प्रत्येक गोष्टीतील बारकावा हा सर्वांना ज्ञातच आहे.
परंतु सध्या बारामती चर्चेत आहे ती नगरपालिकेचे कर्मचारी ,आशा वर्कर्स यांच्या आर्थिक प्रश्नाबाबत बारामतीच्या जनतेने नगरपालिकेची चावी एकहाती राष्ट्रवादीच्या हातात दिली मात्र दिवाळीच्या सणाला कोरोणा योद्धे असलेल्या नगरपालिकेचे कर्मचारी आणि आरोग्य सेवेचे व्रत घेतलेल्या आशा वर्कर्स यांच्या आर्थिक प्रश्नाबाबत मात्र ऐन दिवाळीच्या सणाला कोरोना योद्धे असलेल्या नगरपालिकेचे कर्मचारी आणि आरोग्य दूत, सेवेचे व्रत घेतलेल्या आशा वर्कर्स यांना त्यांनी केलेल्या कामाचा दाम देण्यासाठी नगरपालिका इतकी असमर्थता का दर्शवते आहे.
राज्याचे अर्थमंत्री राहिलेल्या, उत्कृष्ट आर्थिक नियोजन करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादांच्या बारामतीतील नगरपरिषदेला आपल्या आर्थिक अडचणींमुळे कर्मचारी व आशा वर्कर्स यांना पगार देण्यासाठी आंदोलन छेडावे लागते हे न पटणारे कोडे आहे. बरं कर्मचाऱ्यांना जे द्यायचे ते काही अचानक उद्भवलेली अडचण नाही ती धोरणात्मक बाब आहे मग या धोरणात्मक बाबी साठी काही तरतूद यापूर्वीच करावयास हवी होती.
हा काही अचानक उद्भवलेला प्रश्न नाही दरवर्षी तर सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांना देण्यात येत होते फक्त यावेळी त्यांनी पाच हजार रुपये जादा मागितले या हिशोबाने तीनशे कर्मचाऱ्यांचे पंधरा लाख रुपये देण्यासाठी 711 कोटी रुपये अर्थसंकल्प असणाऱ्या नगरपालिकेला इतके मेटाकुटीला येण्याचे, आणी आंदोलकांना दारात बसवण्याचे कारणच काय. बरं ते कर्मचारीही मागील आठ महिन्यापासून बारामतीची जनता रोगाच्या भीतीपोटी घरात बसून होती मात्र हे कर्मचारी आपले योगदान जनसेवेसाठी देत होते त्यात त्यांनी पाच हजार रुपये मागितले तर इतकी अडचण कशी काय होऊ शकते.
ज्या कर्मचाऱ्यांवर बारामतीला स्वच्छ, सुंदर, हरित बारामती बनवण्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर हि वेळ यावी हिशोकांतीका आहे.
खरे तर बारामती आणि आंदोलन हे समीकरण काही नवीन नाही कारण बारामतीत झालेले आंदोलन हे राज्यात आणि देशात पोहोचते ज्याप्रमाणे शेतकरी संघटना किंवा इतर संघटना बारामती सारखे ठिकाण आंदोलनासाठी निवडतात ते ठीक आहे पण खुद्द बारामतीच्या नगरपालिकेचे कर्मचारी आर्थिक मोबदल्यासाठी बारामतीत आंदोलन करतात मग त्याचीही चर्चा सर्वदूर होणारच हे आता बारामतीतील नगर परीषदेच्या लोकप्रतिनिधींनी जाणायला हवे.
बारामती पाहण्यासाठी ,भेट देण्यासाठी देश-विदेशातून मंत्री, राजकारणी, अधिकारी, सिनेअभिनेते, भेट देऊन बारामतीचे गोडवे गातात त्याच बारामतीतील कर्मचाऱ्यांना नगरपालिकेच्या आर्थिक अडचणीची शिकार होऊन नगरपालीकेच्या दारात बसुन आंदोलन करावे लागते.
हा मात्र विरोधाभास आहे त्यामुळे भविष्यात बारामतीची चर्चा फक्त योग्य ,चांगल्या गोष्टींसाठी होईल ना की आंदोलनाची बारामती अशी ख्याती होऊ नये हीच माफक आणि साजेशी अशी अपेक्षा बारामतीकर नागरिक करत असतील यात मात्र काही शंका नाही