छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं;अजित पवारांच्या भूमिकेला भाजप नेत्याचा विरोध
१४ हजार सभासदांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेण्यासाठी कोर्टात गेले

छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं;अजित पवारांच्या भूमिकेला भाजप नेत्याचा विरोध
१४ हजार सभासदांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेण्यासाठी कोर्टात गेले
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पृथ्वीराज जाचक व विद्यमान संचालक मंडळाने छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे नुकसान केले असून, जाचक यांना अजित पवार यांनी जाणीवपूर्वक कोर्टात लावले.
या दोघांची मिलीभगत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव थोरात यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच सभासदांच्या व कारखान्याच्या हितासाठी छत्रपती कारखान्याची निवडणूक समविचारी लोकांना बरोबर घेऊन लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
पृथ्वीराज जाचक यांनी रविवारी छत्रपती कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात आयोजित केलेल्या सर्वपक्षीय आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याच्या कारभारावर ताशेरे ओढत कारखान्याच्या हितासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून कारखान्याची धुरा पृथ्वीराज जाचक यांच्याकडे दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. कारखान्याची निवडणूक एकतर्फी किंवा बिनविरोध करण्याचे सुतवाज देखील त्यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर तानाजीराव थोरात यांच्यासह भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश मोटे, शिवसेनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष रामभाऊ जामदार, माजी तालुकाध्यक्ष भीमराव भोसले, देवेंद्र बनकर, भाजपचे गोविंद देवकाते , भाजपचे डॉ निलेश शिंगाडे, अभिजित देवकाते, रणजीत पाटील, रवींद्र यादव, रघुनाथ चौधर, योगेश थोरात आदींनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
थोरात म्हणाले, छत्रपती कारखान्याचे संचालक मंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सलग दहा वर्ष मुदत वाढवून दिल्याने सत्तेत आहे. पृथ्वीराज जाचक हे १४ हजार सभासदांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेण्यासाठी कोर्टात गेले. त्यामुळेच कारखान्याची निवडणूक पाच वर्षे पुढे ढकलली. कार्यकाळात विद्यमान संचालक मंडळाने गैरकारभार केला म्हणून अजित पवार भर सभेत सांगत होते. हे गैरप्रकार माहीत असून अजित पवार गप्प का होते?. कोर्टकचेऱ्यासाठी आमच्या सभासदांच्या कारखान्याचे कोट्यवधी रुपये खर्च झाले त्याला जबाबदार कोण?, असा सवाल थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.
कारखाना अडचणीतून बाहेर काढायचा
थोरात म्हणाले की, पृथ्वीराज जाचक यांना कष्टकरी सभासदांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेण्यासाठी अजित पवारांनी त्यांना कोर्टात लावले. पाच पाच वर्ष कारखान्याची निवडणूक होऊ दिली नाही. कारखान्यात गैरकारभार सुरू आहे. हे अजित दादांनी कालच्या सभेत सांगितले. मात्र एवढे दिवस हे सर्व माहीत असून ते गप्प का होते?, पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्याला स्वतःच्या संस्थेचे पैसे जादा व्याजदराने दिले. या दहा वर्षांमध्ये कारखान्यावर पट्ट्या व त्यांची कर्ज झाले, त्याला जबाबदार कोण आहे?, मला छत्रपती कारखाना अडचणीतून बाहेर काढायचा म्हणून सांगता, पाच ते दहा हजार क्षमतेचे कारखाने अजितदादा तुम्ही काटेवाडीत बसून चालवता, मग शेजारचा छत्रपती कारखाना तुम्हाला अडचणीत गेलेला का दिसला नाही, असा सवाल तानाजीराव थोरात यांनी यावेळी बोलताना केला.
समविचारी लोकांना बरोबर घेणार
निवडणुकीमध्ये स्वाभिमानी सभासदांना त्यांच्या मतदानाचा हक्क देता यावा, म्हणून ही निवडणूक लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. छत्रपती कारखान्याला वाचवण्यासाठी सभासद शेतकऱ्यांचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकतीने लढवणार असल्याचे तानाजीराव थोरात यांनी सांगितले. अविनाश मोटे यांनी आम्ही महायुतीत असलो तरी ही निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी निगडित असल्याने आम्ही समविचारी लोकांना बरोबर घेऊन लढवणार आहोत. याबाबत आम्हाला वरिष्ठ नेत्यांनी जर कोणत्या आदेश दिले, ते आम्ही पाळणार आहोत. मात्र सध्याच्या स्थितीला आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत.